

शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ व अभ्यासू नेते, तब्बल पाच वेळा काँग्रेसचे नगरसेवक, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार, शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निकटवर्तीय अशी ॲड. अभय छाजेड यांची ओळख. काँग्रेसचे निष्ठावान व तडफदार युवा नेते म्हणून तिकीट मिळाले असताना पक्षातील राजकीय उलथापालथीमुळे अखेरच्या क्षणी ते कापले गेले. पण या धक्क्याने डगमगून न जाता अपक्ष म्हणून निवडणूक लढवून त्यांनी आपली पात्रता सिद्ध केली. त्यांच्या या अविस्मरणीय अशा लढतीची गोष्ट त्यांच्याच शब्दात....
ॲड. अभय छाजेड
पुण्यासारख्या सुसंस्कृत आणि राजकीयदृष्ट्या जागरूक असणाऱ्या शहरात युवक काँग्रेसच्या माध्यमातून माझ्या राजकीय-सामाजिक कार्याचा श्रीगणेशा झाला. काँग्रेस भवन येथे दररोज जाण्याने नव्या ओळखी, नवे सवंगडी मिळत होते. त्यांच्याशी गप्पा आणि चर्चा यांतून विचारांची देवाण-घेवाण वाढली. त्यातूनच पर्वती विधानसभा मतदारसंघातील मार्केट यार्ड, आदिनाथ सोसायटी, महर्षीनगर, मुकुंदनगर अशा साऱ्या परिसरांतील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने व सत्याग्रहातून माझ्यातील कार्यकर्ता घडत गेला. या राजकीय-सामाजिक कार्याला अधिकाराची जोड मिळावी म्हणून अगदी तरुण वयात 1985 मध्ये मी पुणे महापालिकेची निवडणूक लढविली. मात्र, त्यात यश मिळाले नाही. पुढे 1987 मध्ये मी पुणे शहर युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष झालो आणि नंतर कार्याचा विस्तार वाढतच गेला. काँग्रेस पक्षातील ऊठ-बस वाढली, ओळखी वाढल्या, तसेच युवक काँग्रेसचे संघटनही वाढत गेले.
त्यातूनच 1992च्या महापालिका निवडणुकीत माझ्या वॉर्डमधून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळेल, ही खात्री वाटू लागली आणि झालेही तसेच. पक्षाचे कार्य, कामांचे अहवाल, उमेदवारांच्या मुलाखती यांतून माझे नाव पुढे येणे अपेक्षित होते आणि अपेक्षेनुसार ते जाहीरही झाले. मला पक्षाकडून ए-बी फॉर्मही मिळाला. त्यावेळी राज्यात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. पुण्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील त्यावेळी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाची एक जागा त्यांच्या कार्यकर्त्याला मिळावी, ही त्यांची इच्छा होती. छगन भुजबळांचे ते कार्यकर्ते होते, माझ्याच वॉर्डातील विलास भुजबळ. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली. माझे जवळचे मित्र वीरेंद्र किराड यांनी मला मुंबईहून फोन केला आणि उमेदवारांच्या यादीतून माझे नाव कापले गेले, असे मला कळविले. मला त्यामुळे चांगलाच धक्काच बसला.
पक्षाने मला दिलेला ए-बी फॉर्म रद्द केला आणि छगन भुजबळ यांना खूष करण्यासाठी विलास भुजबळांना नव्याने ए-बी फॉर्म देऊन त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली. मी काँग्रेस पक्षातच वाढलो असल्याने पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंड करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. मात्र, कार्यकर्त्यांचा आग्रह वाढल्याने माझा नाईलाज झाला. त्या वर्षी महिलांसाठी 33 टक्के आरक्षण सुरू झाले होते, सिंगल वॉर्ड होता. केवळ कार्यकर्तेच नव्हे, तर अनेक कुटुंबे, खेळाडू, शिक्षक, व्यापारी अशांकडून उमेदवारीसाठी आग््राह केला जाऊ लागल्याने अखेरीस मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतला.
त्या काळात राज्यसभेचे खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे शहर काँग्रेसची सूत्रे हाती घेतली होती. माझ्या कार्यकर्त्यांकडून ‘काँग्रेसचा अपक्ष उमेदवार’ असा माझा प्रचार घरोघरी सुरू होता. केवळ माझ्याच वॉर्डमध्ये नव्हे, तर संपूर्ण शहरातच निवडणूक प्रचारात जात, धर्म, पैसा यांचा आजच्यासारखा धुमाकूळ नव्हता. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मशीन नव्हते, तर बॅलेट पेपरवर शिक्का मारून मतदान करायचे होते. एकूण वातावरण पाहून मला विजयाची खात्री वाटू लागली होती. त्यामुळे मी पाचशेहून अधिक मतांनी विजयी होईल, असा विश्वास मी पत्रकारांना बोलून दाखविला होता.
माझ्या वॉर्डाची मतमोजणी दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू होती. अखेरीस 888 च्या मताधिक्याने मी विजयी झालो. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते. त्यातूनच वॉर्डातील मिरवणुकीला प्रारंभ झाला. वॉर्डातील प्रत्येक भागातून निघालेली ही मिरवणूक तब्बल 12 तासांनी म्हणजे रात्री 8 वाजता संपली. या मिरवणुकीत किमान हजार दीडहजार तरुणांशी व नागरिकांशी मी हस्तांदोलन केले असेन!
मतदानाच्या अगोदरच्या दिवशीची धावपळ, संपूर्ण रात्र जागरण आणि दिवसभर मिरवणूक यामुळे चांगलाच थकलो होतो. घरी गेल्यावर देवाच्या व आई-वडिलांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतला. खासदार कलमाडींचे दिवसभरात भरपूर निरोप आले होते. रात्री 10 च्या सुमारास मी कलमाडी हाऊसला पोहचलो. तेथे गर्दी आणि उत्साहाचा माहोल होता. खा. कलमाडींशी बोलणे झाले आणि त्यांच्या आदेशानुसार मी काँग्रेसचा नगरसेवक बनलो.
त्यावेळी माझ्यासोबत काँग्रेसचे वीरेंद्र किराड, अरुण धिमधिमे, गोपाळ तिवारी, जयंत भोकरे, आबा बागुल, बालाजी तेलकर, मुख्तार शेख, असे सुमारे 18-19 नगरसेवक अपक्ष म्हणून निवडून आले होते. सर्वजण खा. कलमाडींच्या नेतृत्वाखाली पुन्हा काँग्रेसवासी झाले. अशा प्रकारे नगरसेवक म्हणून माझ्या राजकीय कारकीर्दीस प्रारंभ झाला. पुढे चार वेळा माझा वॉर्ड, प्रभागातून खुल्या आरक्षणातून मी काँग्रेसचा नगरसेवक म्हणून निवडून येत गेलो. सलग 5 वेळा खुला प्रवर्ग मिळणे हेदेखील माझ्या दृष्टीने भाग्याचेच होते.
काँग्रेस पक्षाचे कार्य, खा. सुरेश कलमाडींचे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा संच, जनतेचे आशीर्वाद आणि कुटुंबाचे पाठबळ यामुळे सलग 25 वर्षे काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. त्यानंतर मात्र नगरसेवकपदाची निवडणूक न लढविता, काँग्रेस पक्ष-संघटनेतच काम करण्याचे मी ठरविले आणि आजही करीत आहे. शहर पातळीबरोबरच प्रदेश पातळीवरही काम करीत आहे. मात्र, 33 वर्षांपूर्वीचे नगरसेवकपदाच्या पहिल्या निवडणुकीचे ते मंतरलेले दिवस आठवले की, मन आजही मोहरून जाते.
(शब्दांकन : सुनील कडूसकर)