

पुणे: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने बीएचएमसीटीसाठी (हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी) स्वतंत्र सीईटी रद्द करून ती बीबीए-बीसीए-बीएमएस-बीबीएम अभ्यासक्रमांसोबत एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे यंदापासून या सर्व पाच अभ्यासक्रमांसाठी एकच 'एमएएच-बीएचएमसीटी /बीसीए /बीबीए /बीएमएस /बीबीएम-सीईटी २०२६' परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. २८ ते ३० एप्रिलदरम्यान ही एकत्रित सीईटी होणार आहे.
'एमएएच-बीएचएमसीटी/बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम-सीईटी २०२६' साठी १२० मिनिटांचा वेळ निश्चित केला आहे. परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याची माहितीही पत्रकात दिली आहे. विद्यार्थी, पालकांनी आणि शिक्षण संस्थांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
तसेच काही दिवसांपूर्वी सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी २८ ते ३० एप्रिल २०२६ या दरम्यान होणार आहे. या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश पात्रता समान असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एकच परीक्षा अधिक सोयीची आणि लाभदायक ठरेल, हा या निर्णयामागचा उद्देश असल्याची नोंद पत्रकात केली आहे.
विद्यार्थ्यांचा गोंधळ, परीक्षा-व्यवस्थापनाचा खर्च कमी होणार
यापूर्वी बीएचएमसीटी आणि इतर चार अभ्यासक्रमांसाठी दोन स्वतंत्र परीक्षा घेतल्या जात होत्या. त्या तुलनेत एकच परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचा गोंधळ, तयारीचा ताण आणि परीक्षा-व्यवस्थापनाचा खर्च कमी होणार आहे, असे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले आहे.
गेल्यावर्षी झालेली नोंदणी दृष्टिक्षेपात
बी.एचएमसीटी - 1436
बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम- 72259