

माणिक पवार
नसरापूर: भोर तहसीलदार, धर्मादाय आयुक्त, मंडलाधिकारी यांच्या अख्यारीत असलेल्या प्रशासकीय समितीच्या दुर्लक्षामुळे कांजळे येथील काळूबाई मंदिरांमध्ये विविध समस्या निर्माण झाल्या असून देखभालीचा अभाव आणि गैरव्यवस्थामुळे मंदिरांच्या संपत्तीचे आणि परिसराचे नुकसान होत असल्याचे विदारक चित्र आहे. अनेकवेळा मंदिर राहत असून परिसरातील स्वच्छता आणि सुव्यवस्था राखली जात नसल्याने पावित्र्य आणि सौंदर्य कमी होत आहे. तर चालढकलमुळे लिलाव होत नसल्याने नारळे, इतर वस्तू खराब झाल्याने लाखो रुपयावर पाणी पडणार आहे.
कांजळे ( ता. भोर ) काळूबाई मंदिर येथील काळेश्वरी देवस्थान ट्रस्टवर २०१९ पासून प्रशासकीय समितीकडे देखभाल व नियोजनाचे सूत्र आहे. मात्र भोंगळ कारभारामुळे मंदिर परिसरात अनेक दुरवस्था निर्माण झाल्या आहेत. न्यायप्रविष्ठ बाबींची पूर्तता करून लाखोचा जमा होणाऱ्या देणग्या व राज्य सरकारचे निधी आणून मंदिराची देखभाल करणे गरजेचे असताना देखील याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिक व भाविक करत आहे. तर विकास करण्यावर काहींचा विरोध असल्याचे भांडवल करून समिती हात वर करत असल्याचे देखील चर्चा झडत आहे.
येथील काळूबाई मंदिरात अक्षरशः अनेक ठिकाणी घुशी लागल्या असून मोठ मोठे भगदाड पडले आहे. मंदिर प्रवेशद्वाराच्या कमान भागाला गवत उगवले आहे. मंदिरातील अनेक भागात प्लास्टर उखडल्याने जीर्ण अवस्था निर्माण होत आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे मंदिर परिसरात अस्वच्छता पसरली आहे. पाण्याची सोय, इतर मूलभूत सुविधांची कमतरता जाणवते. दिपमाळेची निगा नसून अनेक वर्षापासून मंदिराला रंगरंगोटी नसल्याने वातानुकुलीत व भक्तिमय वातावरणाचा अभाव जाणवत आहे. तहसीलदार राजेंद्र नजन यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी फोन न उचलणे पसंत केले.
किमान देणग्या स्वरूपातून जमा झालेल्या निधीतून मंदिराच्या दुरुस्ती आणि विकासासाठी वापरला जावा. मात्र प्रशासकीय समितीच्या ढिसाळपणामुळे मंदिरातील इतर कामांमध्येही गैरव्यवस्था निर्माण होत असून प्रशासकीय समितीच्या देखरेखेअभावी मंदिरांच्या देणग्या आणि लाखो रुपयांचा निधी जातो कुठे? असा सवाल भाविकांमधून होत आहे. भाविकांच्या सोयीसुविधांवरही परिणाम होत आहे. तसेच आणीबाणीच्या वेळी आवश्यक उपाययोजना बाबत उदासीनता दिसून येत आहे. समितीने मंदिराची दुरुस्ती आणि देखभालीसाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
वर्षापासून लिलाव रखडले...
गेल्या वर्षीची यात्रेची नारळे, साड्या, खण जैसे थे पडून असून लिलावाची रक्कम जादा असल्याने व्यापारी खरेदी करत नसल्याने नारळाची अक्षरश: भुसकट झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. खराब झालेल्या नारळांची सोपस्कार विल्हेवाट लावावी लागणार आहे.
देणग्या बाबत लेखाजोखा असून वर्षानुवर्षे नारळ मंदिर परिसरात फिरत राहत असल्याने तो स्थानिकांना दिला नाही. खराब झालेले नारळाची विल्हेवाट लावणार असून अलीकडच्या काळातील नारळाची लवकरच लिलाव करणार आहोत
सुरेश गेजगे, निरीक्षक धर्मदाय आयुक्त पुणे.