PMC Election History: अखेर जनशक्तीच ठरली प्रभावी

आबा बागूल : लोकवर्गणीतून उभा राहिलेला जननेता; धनशक्तीवर जनशक्तीचा ऐतिहासिक विजय
PMC Election History
PMC Election HistoryPudhari
Published on
Updated on

आबा बागूल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, 1992 पासून राजकारणात, सलग सहावेळा निवडून येणारे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर, अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम करणारे अभ्यासू व जाणकार नेते. राजकारण, समाजकारण, अशा विविध क्षेत्रांत सहजी वावरणारे व्यक्तिमत्त्व, अशी आबा बागूल यांची ओळख. फॅब्रिकेशनच्या कारखान्यातील हेल्पर, गणपती मंडळाचा कार्यकर्ता ते पुण्याचे उपमहापौर, हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. गणेश मंडळाच्या वतीने निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्यात आलेल्या या कार्यकर्त्याची पहिली निवडणूक लोकवर्गणीतून झाली आणि लोकांनीच ती जिंकली... अविस्मरणीय ठरलेल्या या लढतीचा वृत्तांत त्यांच्याच शब्दांत...

PMC Election History
PMC Election: वारजेत राष्ट्रवादीची ‘फूट’ ठरणार भाजपला वरदान? तिन्ही पक्ष आमनेसामने; प्रभागात राजकीय ताप वाढला

माझ्या आयुष्यात अनेक घटना घडल्या, अनेक प्रसंग आले- गेले; पण पुणे महापालिकेसाठी लढविलेली पहिली निवडणूक मी कधीही विसरू शकणार नाही. त्या साऱ्या गोष्टी, ते सारे प्रसंग माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आहेत. धनशक्तीपुढे बावरून गेलेल्या माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी गणपती मंडळ आणि मित्रपरिवार उभा राहिला नसता, तर आजचा आबा बागूल घडलाच नसता. त्यामुळे त्या साऱ्यांचा मी कायमचा ऋणी आहे.

PMC Election History
Viman Nagar Flood Traffic: लोहगाव, वाघोली विकासापासून कोसो दूर

1990 चे दशक माझ्या आयुष्यातील संघर्षमय घटनांचे साक्षीदार आहे. एका फॅबिकेशन कारखान्यात हेल्पर म्हणून काम करीत होतो. कष्ट करण्याची तयारी होती. मनात जिद्द व उमेद होती. त्यामुळे केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि कष्टातूनच मी स्वतःचा फॅबिकेशन व्यवसाय उभा केला. तो करताना अनेक मित्र भेटले. त्यातूनच वसाहतीतील शिवदर्शन मित्रमंडळ हे माझे दुसरे घर झाले. गणेशोत्सव मंडळात राबविलेल्या नवनव्या अभिनव कल्पनांमुळे कार्यकर्ते माझ्या म्हणण्याला मान देऊ लागले. लोकांशी संवाद वाढला. त्यातून समाजोपयोगी कामांची संधी उपलब्ध होऊ लागली. परिणामी, जवळपासच्या लोकांना मी ‌‘आपला माणूस‌’ वाटू लागलो. त्यामुळेच 1985 साली मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली गेली. लोकांनी दाखविलेला हा विश्वास पुढे मी सार्थ ठरविला. त्यामुळेच गणेश मंडळाचा एक साधा कार्यकर्ता पुढे महापालिकेत पोहचू शकला.

PMC Election History
Pune International Marathon: डिसेंबरमध्ये 39 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गात मोठा बदल

अध्यक्ष झाल्यानंतर समाजोपयोगी उपक्रमांची मालिकाच सुरू झाली. आरोग्य शिबिरे, गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम, परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठीचा पाठपुरावा, लोकांच्या कामासाठी अहोरात्र राबण्याची तयारी, यामुळे लोकांच्या मनात मला स्थान मिळाले. सर्वसामान्यांसाठी झटणारा माणूस, अशी प्रतिमा निर्माण झाल्याने 1992 च्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी लोकांकडूनच आग्रह होऊ लागला. मित्रपरिवाराबरोबर मंडळाचे कार्यकर्ते व जवळपासचे रहिवासी हेच आग्रह करू लागले. आपला माणूस महापालिकेत पाहिजे, तरच आपली कामे होतील, अशी त्यांची धारणा होती. माझ्याकडून त्यांच्या या अपेक्षा असणेही स्वाभाविक होते. त्यांच्या इच्छेला मान देण्यासाठी सर्वप्रथम मी त्या वेळी सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली. मात्र, काँग्रेसने एका धनाढ्य व्यावसायिकाच्या बाजूने कौल दिला. बहुधा त्यांना असे वाटले असावे की, असा उमेदवार आपल्या पैशाच्या जोरावर सर्वाधिक मते मिळवून विजयी होईल.

PMC Election History
AI Dam Research Pune‌: ‘एआय‌’च्या साहाय्याने आता धरणांचे संशोधन!

काँग्रेसच्या तत्कालीने नेतृत्वाने घेतलेला हा निर्णय माझ्यासाठी उमेदवारी मागणाऱ्यांना चांगलाच खटकला. त्यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त करतानाच कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायचीच, असा निर्धार केला. त्या वेळी मित्रांनी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिलेले बळ व पाठिंबा अजूनही मला आठवतोय. ‌‘आमचा माणूस आम्हीच आणणार‌’ असेही काहींनी काँग्रेसच्या नेत्यांना ऐकविले आणि ‌‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती‌’च्या या लढतीला प्रारंभ झाला.

PMC Election History
Pune Shirur Highway: पुणे–शिरूर सहापदरी उन्नत महामार्ग तीन वर्षांत पूर्ण करा

पक्षाने उमेदवारी न दिल्याने मला अपक्ष लढविण्याचा निर्णय झाला. एकीकडे कार्यकर्त्यांनी हे ठरवून टाकले; पण मला काळजी वाटत होती ती एका बलाढ्य आणि धनाढ्य व्यक्तीसमोर पैशाअभावी आपला कसा निभाव लागणार? आपण निवडणूक कशी लढणार? पैसा कसा उभा करायचा? लोक म्हणताहेत, उभे राहायचे; पण प्रचारासाठी पैसा कुठून आणायचा? या चिंतेत असतानाच याच लोकांनी मला दिलासा दिला. मला पाठबळ देण्यासाठी कार्यकर्त्यांनी वर्गणी काढली. लोकांनी स्वतःहून निवडणूक निधी उभा केला. कोणी 11 रुपये, कोणी 25 रुपये दिले. या रकमेपेक्षा मोठे होते ते त्यांचे माझ्यावरील प्रेम, माझ्यावरील विश्वास. लोकांच्या अपेक्षांबरोबरच या सगळ्याच गोष्टींचे ओझे मनावर घेऊन मी रिंगणात तर उतरलो. प्रचाराचे वातावरण वेगळेच होते. चमकदार पोस्टर्स नव्हती, मोठे कटआउट नव्हते, बॅनर्स नव्हते; पण प्रत्येक गल्ली, प्रत्येक वस्तीत माझ्यासाठी घरोघर फिरणारे कार्यकर्ते होते. माझ्यासाठी घराघरांत जाऊन मतांचा जोगवा ते मागत होते. ‌‘हा आपला हक्काचा माणूस आहे, यालाच आपण महापालिकेत पाठवायचे,‌’ असा प्रचार प्रत्येक कार्यकर्ता करीत होता. त्याचा जनमानसावर खूपच परिणाम झाला. आमच्याकडे प्रचारासाठी ना मोठे नेते, ना वक्ते. कारण, मी अपक्ष होतो, तेही एका धनदांडग्या काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध. पण, माझ्यासाठी मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकरवी निवडणुकीची सारी सूत्रे वॉर्डातील मतदारांनीच हाती घेतली. तेच माझे वक्तेही झाले आणि ‌‘माउथ टू माउथ पब्लिसिटी‌’ची ताकद काय असते, ते नंतर सर्वांना दिसले.

PMC Election History
Ajit Pawar Land Deal: व्यवहार रद्द करणारे अजित पवार कोण? अंजली दमानियांचा सवाल

प्रत्यक्ष मतदानाचा दिवस तर आजही जसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहतो. माझ्या परिसरातील मतदान केंद्रांवरील मतदारांच्या रांगा पाहताना तत्कालीन पोलिस उपायुक्त विक्रम बोके यांनी विचारले, ‌‘मतदानासाठी इतक्या मोठ्या संख्येने लोक कसे काय बाहेर पडले, काय जादू केलीत?‌’ त्यांच्या या प्रश्नाने लोकांचे आपल्यावर किती प्रेम आहे, याची जाणीव मला झाली आणि त्यांना कधीच अंतर द्यायचे नाही, हे मी मनोमन ठरविले. राजकारणात बरेचदा धनशक्तीपुढे सत्ता झुकत असते. पण, त्या दिवशी माझ्या वॉर्डातील मतदारांनी जनशक्तीची ताकद काय असते, हे पुणे शहराला दाखवून दिले.

PMC Election History
Pune Ring Road: रिंग रोडचा ‘फास्टर‌’ प्लॅन

मतमोजणीच्या वेळी वातावरण चांगलेच तापलेले होते. पण, अखेर निकाल जाहीर झाला आणि जनशक्तीचा विजय झाला. लोकशाहीची खरी ताकद त्या वेळी जाणवली. लोकांनी एकदा ठरविले, की मग कितीही पैसा ओतला तरी मतदार बधत नाहीत, हे त्या दिवशी दिसले. काही पक्षांच्या दृष्टीने सत्ता, पैसा आणि दादागिरी हेच निवडून येण्याचे निकष होते. पण, या मानसिकतेला जनतेने जोरदार धक्का दिला. लोकवर्गणी काढून उभा केलेला उमेदवार जिंकला आणि मी त्या जनशक्तीचा प्रतिनिधी म्हणून सभागृहात पोहचलो. ही फक्त निवडणूक नव्हती, तर हा लोकांच्या विश्वासाचा विजय होता. यानंतरही महापालिकेच्या पाच निवडणुका मी लढलो आणि जिंकलोही; पण पहिल्या लढतीइतकी चुरस नंतर कधीही अनुभवास आली नाही.

(शब्दांकन : सुनील कडूसकर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news