

पुणे : पुणे ते शिरूर या महामार्गावरील सहापदरी उन्नत मार्ग आणि चारपदरी जमिनीच्या समतल (ॲट ग्रेड) मार्गाचे काम तीन वर्षांत पूर्ण करावे. हा रस्ता वेळेत पूर्ण करावा आणि रस्त्याचे काम करताना कुठेही दिरंगाई करू नये, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर यादरम्यान सद्यःस्थितीत असलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचा त्रास कमी करावा, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.
मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत फडणवीस यांनी या सूचना दिल्या. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले, मुख्य सचिव राजेश कुमार आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुणे ते शिरूर यादरम्यान औद्योगिक वसाहती असल्याने वाहनांची अत्यंत वर्दळ आणि भविष्यातील वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता महामार्गाचे काम विनाविलंब सुरू करावे. पुणे ते शिरूर महामार्गावर 35 किलोमीटर उन्नत महामार्गापैकी 7.40 किलोमीटर लांबीमध्ये जमिनीला समांतर रस्ता, त्यावर रस्ता व वर मेट्रो अशा व्हाया डक्टची निर्मिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळ यांनी समन्वयाने करावी.