

दिगंबर दराडे
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामाला आता चांगली गती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हाती घेण्यात आलेल्या या बाह्य रिंग रोड प्रकल्पाचे आत्तापर्यंत आठ महिन्यात सुमारे 18 टक्के काम पूर्ण झाले आहे. विशेषतः पश्चिम भागातील काम वेगाने सुरू असून, 2026 च्या अखेरपर्यंत 70 टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
72 किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. पश्चिम रिंग रोडच्या कामाला सध्या मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. प्रकल्पाचे काम सुरू होऊन आठ महिने झाले असून, आतापर्यंत 18 टक्के काम पूर्ण झाले आहे.
यामध्ये प्रामुख्याने सिंहगड किल्ल्याजवळ बांधण्यात येत असलेल्या 5.87 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम प्रगतिपथावर आहे. यापैकी सुमारे दीड किलोमीटर बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. हा बोगदा खामगाव (मावळ) ते कल्याण दरम्यान 35 किलोमीटरचे अंतर काही मिनिटांवर आणणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात डोंगराळ भागाचे सपाटीकरण, नद्यांवरील पूल आणि भराव टाकण्याचे काम यांना प्राधान्य देण्यात आले आहे. रिंग रोडसाठी भूसंपादनाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. पश्चिम भागातील 99 टक्के, तर पूर्व भागातील सुमारे 98 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष बांधकामाला मोठ्या प्रमाणात अडथळे कमी झाले आहेत. हा सहा पदरी रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर शहरातील अवजड वाहतूक शहराबाहेरून वळेल, ज्यामुळे पुणे-मुंबईसह पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे- बंगळूरू अशा सहा प्रमुख महामार्गांची थेट कनेक्टिव्हिटी वाढेल आणि पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. रिंग रोडच्या भोवताल असलेल्या 117 गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले.
राज्य सरकारकडे येत्या दोन वर्षांत या गावांचा विकास आराखडा सादर केला जाणार आहे. त्यामुळे या 117 गावांच्या विकासाला नवी दिशा मिळेल. या गावांमध्ये शाळा, टाउनशिप, ट्रक टर्मिनल, लॉजिस्टिक पार्क आणि ट्रॉमा केअरसारख्या अनेक सुविधा उभारल्या जाणार आहेत. हवेली, मुळशी, भोर, वेल्हे आणि पुरंदर या तालुक्यांतील या गावांचा विकास एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आला असून, सुमारे 668 चौ.किमी क्षेत्राचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.
विशेषतः पश्चिम भागातील काम वेगाने सुरू असून, 2026 च्या अखेरपर्यंत 70 टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हाती घेण्यात आलेल्या या बाह्य रिंग रोड प्रकल्पाचे आत्तापर्यंत आठ महिन्यात सुमारे 18 टक्के काम पूर्ण झाले आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मास्टरप्लॅन तयार करण्यात आलेला आहे. गतिमानपद्धतीने पुणे रिंग रोडचे काम सुरू आहे.
राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी
भविष्यात या गावांचा विकास करताना त्या गावातील लोकसंख्याही वाढेल. त्यामुळे त्या गावांसाठीची पाणीपुरवठ्याची सुविधा, पाण्याच्या टाक्या, क्रीडांगणे, स्मशानभूमी, मलनिस्सारण प्रकल्प, पर्यटन, अग्निशामक दलासारख्या सुविधांसाठी जागा आरक्षित करावी लागेल. नद्यांचे प्रदूषण होऊ नये, यासाठी नद्यांजवळ सांडपाणी प्रकल्प उभारून अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. यासाठी दोन ग्रोथ सेंटर विकसित होणार आहेत.