पुणे : पुढारी वृत्तसेवा
पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी महापालिका शहरातील प्रमुख रस्ते, उद्याने, महाविद्यालये अशा मोक्याच्या 500 ठिकाणी चार्जिंग स्टेशन आणि 200 ठिकाणी डॉकिंग स्टेशन्स उभारणार आहे. ई-बाईक रेटिंग या उपक्रमांतर्गत नागरिकांना कमीत कमी दरामध्ये भाडेतत्त्वावर ई-बाईक उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या उपक्रमासाठी निवडल्या जाणार्या कंपनीला मिळणार्या उत्पन्नातही महापालिकेला वाटा मिळणार असून, असा उपक्रम राबविणारे पुणे हे देशातील पहिले शहर असेल.
यासाठी महापालिकेने निविदा मागविली आहे. पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढवून प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या गाइडलाइननुसारच ही निविदा मागविण्यात आली आहे. त्यानुसार 500 चौ. कि. मी.च्या शहरात ई-बाईकचे चार्जिंग स्टेशन आणि डॉकिंग स्टेशनसाठी मोक्याच्या 700 जागा निवडण्यात आल्या आहेत. नागरिकांना सहजासहजी ई-बाईक उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सरासरी प्रत्येक चौरस कि. मी.च्या परिसरात एक चार्जिंग स्टेशन असेल. या चार्जिंग स्टेशनवर स्वत:च्या मालकीची बाईक वापरणाऱ्यांसाठी बाईक चार्जिंग करता येणार आहे. तसेच डॉकिंग स्टेशनवर बॅटरी स्वाईपचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
हेही वाचा