#MonkeyvsDog बीड : माकडं खरोखर सूड घेऊ शकतात का?

#MonkeyvsDog बीड : माकडं खरोखर सूड घेऊ शकतात का?
#MonkeyvsDog बीड : माकडं खरोखर सूड घेऊ शकतात का?
Published on
Updated on

राज कुलकर्णी

बीड जिल्ह्यातल्या लवूळ गावात वानरांनी सूडभावनेतून कुत्र्यांना मारलं (#MonkeyvsDog) अशी बातमी वाचायला मिळाली. यात नेमकं तथ्य किती आणि अफवा किती माहीत नाही. पण माकडांच्या वागण्याचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या मते, एका प्राण्याबद्दल दुसऱ्या प्राण्याच्या मनात राग किंवा सूडाची भावना निर्माण होणं नैसर्गिक आहे. इतर प्राण्यांच्या तुलनेत ही भावना माकडांमधे जास्त आढऴून येते.

काही प्राण्यांमधे जन्मापासूनच वैर असतं, जसं कि उंदीर आणि मांजर. याचं कारण उंदीर हे मांजराचं भक्ष्य आहे हेही असेल. पण साप आणि मुंगूस हे एकमेकांचे भक्ष्य नसूनही पारंपारिक वैरी समजले जातात. यातही किती तथ्य आहे हे माहीत नाही. पण दोन व्यक्तींमधलं वैर किती प्रखर आहे हे सांगण्यासाठी 'साप-मुंगसाचं वैर' असे शब्द वापरले जातात.

न्यायाच्या चौकटीतला सूड

माणूस हा माकडापासून उत्क्रांत झालाय. माणसातही प्राण्यांप्रमाणे सूड आणि वैरभावना होत्याच! पण उत्क्रांतीच्या क्रमात त्यांची तीव्रता कमी झाली. मानव सामाजिक प्राणी झाला. तरीही त्याच्यात काही अंशी सूड-वैरभावना असण्याची शक्यता आहे. मानव उत्क्रांत झाला. सामाजिक बनला. समूहानं राहू लागला. समाजव्यवस्था निर्माण झाली. त्यामुळे सूड किंवा वैरभावनेवर सामाजिक नियंत्रण आलं. पण मनातल्या सूडभावनेचं कमी अधिक प्रमाणात प्रकटीकरण मानव करतच राहीला. (#MonkeyvsDog)

मानव सामाजिक झाला तरी त्यानं 'खून का बदला खून से'सारखे समाजनियमही बनवले. जगभरातले दंड, न्याय याच भूमिकेतून निर्माण झाले असावेत. मृत्यूदंड, देहदंड या शिक्षा जगभरातल्या समाजव्यवस्थेत आहेत. त्याला काही प्रमाणात पर्याय म्हणून धिकदंड, द्रव्यदंड प्रचलित झाले. पण दंड हा समाजव्यवस्थेतला महत्वाचा भाग राहीलेला आहे.

प्राचीन काळी गुन्हेगारांना जाहीररीत्या शिक्षा दिली जायची. हे पहायला प्रचंड गर्दी व्हायची. कारण गुन्हेगाराला शिक्षा देताना पाहण्यातही अनेकांना आनंद मिळत असावा. ही भावना आजही सगळीकडं आढळते. न्यायाने जरी शिक्षा मिळाली नाही तरी मनातल्या सूडभावना पूर्ण करण्यासाठी लोक त्या आरोपीला शिक्षा द्यायला आतुर असतात. (#MonkeyvsDog)

समाजाला संशोधनाची गरज

गोमांस असल्याच्या संशयावरून उत्तर भारतात मॉब लिंचिंग झालं. परवा अमृतसर इथं एका गुरूद्वारात एका तरुणाची हत्या करण्यात आली. हे 'अमानवी' कृत्य सूड किंवा बदला घेण्याच्याच भावनेनं केलं गेलं होतं पण त्यामागे माणसांचाच हात होता! या दोन्ही हत्यांचं समर्थनही याच भावनेनं काही समाजकटंकांनी केलं होतं.

दाभोळकर किंवा गौरी लंकेश यांच्या हत्येवर आनंदी होणारे लोकही अशीच वैरभावना मनी बाळगणारे होते. खरं तर, याच लोकांच्या मनात दाभोळकर, गौरी लंकेश यांना ठार मारायची इच्छा असणार. ती कोणीतरी पूर्ण केली म्हणून यांना आनंद झाला. गांधीजींची हत्या झाल्यावर पेढे वाटणारे लोकही याच मानसिकतेचे आहेत. (#MonkeyvsDog)

सूड किंवा वैर ही मानवातली उपजत प्रवृत्ती आहे का, यावर अजून संशोधन व्हायला हवं. पण नियमित येणारे अनुभव याला दुजोरा देतात. म्हणून तर त्या त्या काळातील विचारवंतांच्या शिकवणीत 'वैराचे शमन अवैराने होते', 'अहिंसा आणि प्रेम', 'मरणांती वैर संपते' असे विचारउठून दिसतात. कारण समाजात जे नव्हतं तेच त्यांना रूढ करायचं होतं.

महाभारताचं वर्णन 'सुडाची कथा'

भारतातल्या जैन आणि बौद्ध या धर्मांचा पाया हा अहिंसक आणि वैरमुक्त समाजाचा आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही धर्म वैदिक संस्कृतीतल्या धर्मसुधारणा स्वरूपात विकसित झालेले आहेत. भारतीय लोकांवर साहित्य आणि कलेचा प्रभाव आहे.

भारतातल्या दोन प्रमुख धार्मिक ग्रंथांपैकी रामायणात वैरभावनेचं वर्णन आलंय. पण ते मरणांती संपतं असंही सांगितलंय. म्हणजे मृत्यूपर्यंत वैरत्वाला मान्यता दिली आहे. महाभारताचं वर्णनच अनेकांनी 'सुडाची कथा' असं केलंय. रामायणात रावण तर महाभारतात दुर्योधन खलनायक आहे. खलनायकाचा अंत हा भारतीयांच्या मनात आनंद देणारा विषय आहे.

सिनेमातून मिळणारं खतपाणी

भारतीयांवर सिनेमाचाही विलक्षण प्रभाव आहे. कधी जनतेच्या वर्तणुकीतून घडलेल्या प्रसंगावर सिनेमे बनतात. कधी सिनेमे बघून जनता त्याचं अनुकरण करते. समाजाचा प्रभाव सिनेमावर पडतो की सिनेमाच्या आभासी दुनियेचा प्रभाव वास्तव जीवनावर, हा चर्चेचा विषय आहे. मारधाड आणि खलनायकाचा अंत दाखवलेल्या सिनेमाचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना आवडतो. खलनायकाला मार खाताना पाहून खूप आनंद होतो.

नायक जेव्हा खलनायकाला मारतो तेव्हा प्रेक्षक उघडपणे 'मार मार अजून मार' म्हणताना दिसतात. सिनेमात सासूनं आधी दिलेला त्रास पाहून अत्यंत दु:खी झालेल्या महिलांना नंतर जेव्हा सासूला त्रास होऊ लागतो तेव्हा मनातल्या मनात खूप आनंद होत असतो. कारण तमाम भारतीयांचं मन राग आणि सूडभावनेनं प्रभावित आहे. सूड किंवा बदला घेणं प्रत्येकाला जमेलच असं नाही, पण कोणी बदला घेत असेल तर त्यात समाधान शोधणं हे नैसर्गिक आहे.

सूडाचं राजकारण

राजकारणातही हेच दिसतं. आपण एखाद्या राजकीय पक्षासाठी कष्ट करतो. आपला पक्ष सत्तेत आल्यावर आपल्यालाही त्या कष्टाच्या, त्रासाच्या, वैराच्या शमनाचं सुख किंवा समाधान मिळायला हवं असं वाटतं. विरोधात असताना त्रास झाला म्हणून तुम्ही सत्तेत आल्यावर तसाच त्रास विरोधकांना देत असाल तर, तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला?

हा विचार जरी महत्वाचा असला तरी सूडभावना ही मानवी जीवनातली नैसर्गिक भावना आहे. हे वास्तव आहे, जे आदर्शवाद आणि तत्वज्ञानाच्या नावाखाली डावललं जातं. सूड किंवा वैर या मानवी भावनेला राजकीय स्वार्थासाठी वापरलं जातं. एखाद्या सिनेमाच्या कथेसारख्या खोट्या घटना रचून त्या लोकांच्या गळी उतरवल्या जातात. त्यांच्या प्रचारातून सूड घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं जातं.

जगभरातल्या सत्ताधीशांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी हे केलेलं आहे. त्यांनी रचलेले शत्रू फसवे होते. लोकांमधे पेटवलेली सूड किंवा वैरभावनाही फसवी होती. पण त्यातून आलेला राग मात्र खरा होता. हा राग शांत होणं गरजेचं असतं. त्यामुळं सूड उगवणं हाच जीवनाचा हेतू बनतो आणि मानव मग या सूडभावनेचाच गुलाम बनून जातो. अगदी उत्क्रांतीपूर्व वानरासारखा!

साभार – kolaj.in

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news