चाकण : पुढारी वृत्तसेवा
शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे गुरुवारी (दि. २३) रात्री साडेनऊच्या सुमारास एका युवकाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. या प्रकरणी शेलपिंपळगाव येथील एका सराईत गुन्हेगारासह चौघांवर चाकण पोलिसांत रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जुन्या वादातुन हा खुन झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नागेश सुभाष कराळे (वय ३७, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या बाबत गिरीश बाबासाहेब कराळे (वय २९, रा. शेलपिंपळगाव) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश बाजीराव दौंडकर (रा. शेलपिंपळगाव) व त्याचे तीन अनोळखी साथीदार अशा चौघांवर चाकण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ नागेश कराळे मोटारीत बसत असताना हल्लेखोरांनी मोटारीच्या काचा फोडून नागेशवर सहा गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या नागेशला तातडीने चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. खुनाची घटना लगतच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
घटनास्थळी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपआयुक्त मंचक इप्पर, सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे, चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, महाळुंगेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार आदींनी भेट दिली. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
आरोपी योगेश दौंडकर आणि नागेश कराळे यांच्यात जुने वाद होते. यातून काही मंडळींच्या पाठबळावर नागेशचा खुन करण्यात आल्याचा आरोप कराळे कुटुंबीयांनी केला. त्याआधारे जबाब पोलिसांत नोंदविले जात आहेत. पोलिसांनी काहींची चौकशी केली आहे. या घटनेमुळे शेलपिंपळगावात शुक्रवारी (दि. २४) सर्व व्यवहार बंद सायंकाळपर्यंत बंद ठेवण्यात आले.