लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा
हवेली तहसिल कार्यालयातील अर्धन्यायीक प्रकरणातील संचिका दलालांकडे दिल्याने कार्यालयातील सर्वच निकाल संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने येथील सर्व केसेस पुनर्वीलोकनात फेरसुनावणीसाठी घेण्याची मागणी हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हवेली तहसिल कार्यालयातील अर्धन्यायीक प्रकरणातील संचिका कार्यालयात सुरक्षित ठेवण्याऐवजी प्रकरणांचे निकाल बनवून आणण्यासाठी दलालांना दिले असल्याची लेखी तक्रार हवेली तालुक्यातील एका शेतकऱ्याने केल्या नंतर हा गंभीर प्रकार ऊघड झाला आहे.
दै. 'पुढारी'त यासंबंधी वृत्त प्रसिद्ध होताच जिल्ह्याची महसूल यंत्रणा खडबडून जागी झाली असून, जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. हवेली प्रांत कार्यालयाने लेखी खुलासा मागीतला, तर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी चौकशीचे आदेश देत तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले. असे असले तरी अद्याप पर्यंत चौकशी धिम्या गतीनेच चालू आहे.
हा गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वी तालुक्यातील दलालांचा हस्तक्षेप असलेल्या प्रकणांची चौकशी करण्याची मागणी केली व तालुक्यातील दप्तर तपासणी करून महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम २५७ अन्वये पुनर्वीलोकनात प्रकरणांची फेरसुनावणी घेण्याची मागणी हवेली तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे तसे न झाल्यास तालुक्यातील काही शेतकरी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत.
दै. पुढारी मध्ये यासंदर्भात बातमी आल्यानंतर याची दखल घेऊन हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांच्याकडे लेखी खुलासा मागीतला आहे सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे कळविले आहे तर चौकशी अंती दोषींवर कारवाई करण्यात येईल असे हवेलीचे उपविभागीय महसुल अधिकारी संजय आसवले यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.