

पुणे : पुढारी वृत्तसेवा
मधुमेहाविषयी जनजागृती करण्यासाठी ब्ल्यू ब्रिगेड रनिंग क्लबच्या सहा धावपटूंनी पुणे ते कोल्हापूर हे 220 कि.मी. अंतर पूर्ण करीत वेगळा उपक्रम राबविला.
ब्ल्यू ब्रिगेडचे संस्थापक अजय देसाई यांनी सुरु केलेल्या या उपक्रमात सहा धावपटूंनी दोन रात्री आणि दोन दिवसांत हा पराक्रम केला आहे. अजय देसाई, राष्ट्रीय सायकलपटू प्रीती मस्के, फिटनेस कोच अझीझ मास्टर आणि श्यामल मंडोल, मॅरेथॉनपटू विकास सोळंकी आणि चित्रपट निर्माता- लेखक प्रशांत पेठे या सहा धावपटूंनी ही धाव पूर्ण केली आहे.
प्रशांत पेठे यांनी प्रतिकिलोमीटर 100 रुपये याप्रमाणे 22,000 तर अजय देसाई यानी प्रतिकिलोमीटर 50 रुपये याप्रमाणे 11,000 रुपयांचा निधी जमा करून ही दानपेटी पुढे सरकवली, आणि पाहता पाहता देणार्यांचे हात पुढे येऊ लागले. हा सगळा निधी मधुमेहावर भरीव काम करणार्या 'नित्याशा' या स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
'ब्ल्यू ब्रिगेड'चे अजय देसाई यांच्या वडिलांनी मधुमेहामुळे आपली दृष्टी गमावली, स्वत: देसाई यांनी अनुवंशाने आलेल्या मधुमेहाशी बराच काळ दोन हात केले, आणि शेवटी उपाय म्हणून धावण्यास सुरुवात केली. त्यांचे वजन कमी झाले, मधुमेह सहजपणे नियंत्रणात राहू लागला. धावण्याने एक आरोग्यसंपन्न जीवनशैली विकसित होते, हे जनमानसात रुजवण्याचे काम, कोणतेही शुल्क न आकारता सुरु असल्याचे देसाई यांनी सांगितले.