

जोहान्सबर्ग; पुढारी ऑनलाईन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 26 डिसेंबरपासून सुरू होणारी पहिली कसोटी प्रेक्षकांशिवाय खेळवली जाणार आहे. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गामुळे साऊथ आफ्रिका क्रिकेट बोर्डने हा निर्णय घेतला असून सामन्याच्या तिकीटांची विक्री करणार नसल्याचेही बोर्डाने सांगितले आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून या दौ-यात यजमान संघाविरुद्ध (IND vs SA) तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट पार्कमध्ये हा सामना खेळला जाणार असून भारत पहिल्या कसोटीदरम्यान प्रेक्षकांचे स्टँड रिकामे दिसतील.
द. आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर द. आफ्रिका क्रिकेट बोर्डाने पहिल्या कसोटीसाठी तिकीट न विकण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन कोरोना गाईड लाईननुसार, सरकारने 2000 लोकांना प्रवेशाची परवानगी दिली आहे, परंतु दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने पहिली कसोटी प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, असोसिएशन आणि स्थानिक पदाधिकारी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. (IND vs SA)
वाँडरर्स येथे 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांच्या प्रवेशाबाबत अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. त्या सामन्याची तिकिटे अजून विक्रीसाठी ठेवली नसल्याचे समजते आहे. स्टेडियमच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे स्टेडियम व्यवस्थापनाने कळवले आहे.
दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला मुंबईत 3 दिवस क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यानंतरही भारतीय संघ 1 दिवस क्वारंटाईनमध्ये राहिला. यादरम्यान त्याच्या 3 कोरोना चाचण्याही झाल्या. त्यानंतर टीम इंडियाने सरावही सुरू केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाला प्रशिक्षण देतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले.
कसोटी मालिका : पहिली कसोटी : २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन), दुसरी कसोटी : 3 ते 7 जानेवारी 2022 (जोहान्सबर्ग), तिसरी कसोटी : 11 ते 15 जानेवारी 2022 (केपटाऊन)
वनडे मालिका : पहिली वनडे : १९ जानेवारी २०२२ (पार्ल), दुसरी वनडे : 21 जानेवारी 2022 (पार्ल), तिसरी वनडे : 23 जानेवारी 2022 (केप टाऊन)