पुणे : पुढारी वृत्तसेवा
शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याने मोठ्या प्रमाणात माया गोळा केल्याचे समोर आले आहे. त्याच्या चौकशीत त्याच्याकडून लपवून ठेवलेली आणखी 1 कोटी 59 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. त्याबरोबरच त्याच्याकडून 44 वेगवेगळ्या प्रकारचे १४५ तोळे सोन्याचे दागिने असलेला डबा शोधून काढत मोठे घबाड जप्त केले आहे. त्याच्याकडून आतापर्यंत 2 कोटी 47 लाख 81 हजारांची रोकड आणि दागिने जप्त केले आहे.
2019-2020 मधील टीईटी परिक्षेत परिक्षार्थींकडून पैसे स्विकारून परिक्षेच्या निकालात फेरफार करून त्यांना पात्र केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याचा सहभाग आढळल्याने त्याला 16 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी दिल्यानंतर त्याच्याकडील चौकशीत त्याने परीक्षेच्या माध्यमातून त्याने गैर लाभाने कमवलेली 88 लाख 49 हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली होती. तसेच 5 ग्रॅम सोन्याचे नाणे, 5 तोळ्याचे 5 लाख 50 हजारांचे दागिने जप्त केले होते. तसेच एफडी केल्याची कागदपत्रे जप्त केली होती.
सुपेकडील चौकशी दरम्यान सुपेने दोन पैशांच्या बॅगांपैकी त्याच्या मुलीकडे एक बॅग ठेवल्याचे, तसेच त्याच्या जावायाने त्याच्या मित्राकडे दुसरी बॅग ठेवल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याचा जावई नितीन पाटील व मुलगी कोमल पाटील यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले. पैशाबाबत त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर तपास अधिकारी निरीक्षक कुमार घाडगे व तपास पथकातील अमंलदारांनी तुकाराम सुपे, जावई व मुली यांना रहयला असलेल्या चर्होली येथे जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी त्यांना 97 हजार रूपये सापडले.
चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार पैशाच्या दोन्ही बॅगा न मिळाल्याने मुलगी आणि जावयाकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यामध्ये नितीन पाटील याने त्याचा मित्र विपीन याच्या वाघोली येथील बंद फ्लॅटमध्ये त्या बॅगा ठेवल्याचे समजले. विपीनच्या फ्लॅटची झडती घेतली असता, त्या फ्लॅटमध्ये दोन्ही बॅगा व सोबत एक सुटकेस सापडली. त्या बॅगा उघडून पाहिल्या असता त्यात मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली. त्या पैशाची मोजणी केली असता ती तब्बल 1 कोटी 58 लाख 35 हजार 10 रूपयांची असल्याचे निष्पन्न झाले.
या बॅगांसोबत आढळलेल्या सुटकेस व एका बॅग मधील प्लास्टीकच्या पिशवीमध्ये दागिन्यांचा एक डबा आढळला. त्या डब्ब्यामध्ये 44 वेगवेगळ्या प्रकाराचे दागिने पोलिसांना सापडले. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कुमार घाडगे, अमंलदार संदेश कर्णे, नितेश शेलार, नितीन चांदणे, कोमल भोसले, सौरभ घाटे यांनी ही कारवाई केली.
आरोग्य विभाग तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या (म्हाडा) भरती परीक्षेतील पेपर फुटीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी डॉ. प्रितिश देशमुख यांच्या घरझडतीत शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची हॉलतिकीटे सापडली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर टीईटीमधील गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे याच्यासह तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर या दोघांना अटक करण्यात आली होती.
सुपे आणि सावरीकर यांनी 2019-20 मधील शिक्षक पात्रता परीक्षेतील काही उमेदवारांकडून पैसे स्विकारून परिक्षेतील निकालात फेरफार केले होते. अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविले होते. चौकशीत देशमुख याच्यासह अटकेत असलेले त्याचे साथीदार संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांनी एजंटामार्फत सुपे, सावरीकर यांच्याबरोबर संगमनत करून गैरव्यवहार केल्याचे उजेडात आले.
गुन्ह्याचा तपास करत असताना संजय शाहुराव सानप (40, रा. वडझरी, ता. पाटोदा, जिल्हा बीड) याचा गुन्ह्यात सहभाग आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याही चौकशीत महत्वपूर्ण बाबी समोर येण्याची शक्यता आहे. त्याला आज (सोमवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.