पुणे : पुढारी वृत्तसेवा
'अलिकडे मंदिरांबद्दलची अनास्था इतकी वाढली आहे की, अनेक मंदिरांच्या आजूबाजूला कचराकुंड्या तयार झाल्या आहेत. मंदिरे हे आपले वैभव आहेत ते आपणच जपले पाहिजे, यासाठी मंदिरांमागचे विज्ञान नवीन पिढीला समजून सांगितले पाहिजे,' अशी भावना मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केली.
कै. मोरेश्वर कुंटे आणि त्यांच्या पत्नी विजया कुंटे यांनी पाहिलेल्या 18 हजार मंदिरांपैकी काही आगळ्यावेगळ्या मंदिरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजिले आहे. 'गाणारे दगड आणि बोलणारे पाषाण' या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. देगलूरकर आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे रवींद्र देव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कैलास सोनटक्के, प्रभाकर कुंटे, प्रियांका कुंटे, प्र. के. घाणेकर, मिलिंद तुळाणकर आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. देगलूरकर म्हणाले, "मंदिरे पाहायला जाणार्या माणसांमध्ये अनेक गैरसमज आहेत, त्यातूनच मंदिराबद्दलची आणि एकूण आपल्या संस्कृतीबद्दलची अनास्था वाढीस लागली आहे. ही अनास्था दूर करायची असेल, तर नवीन पिढीपर्यंत अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून मंदिर उभारणी मागील विज्ञान पोहचवले पाहिजे, त्यासाठी शाळा-शाळांमधून प्रदर्शन भरविले पाहिजे," रवींद्र देव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. हे प्रदर्शन 20 डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत पाहता येईल.
हेही वाचा