पुणे : पती पत्नीला कार चालवण्यास शिकवताना विहिरीत कोसळली; पत्नीचा जागीच मृत्यू | पुढारी

पुणे : पती पत्नीला कार चालवण्यास शिकवताना विहिरीत कोसळली; पत्नीचा जागीच मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पती आपल्या पत्नीला कार चालविण्यास शिकवत असताना पत्नीचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पडून झालेल्या अपघातामध्ये वर्षा दीपक आदक (वय ३०, रा. शेखर हाइट्स सोसायटी, माळीमळा रोड, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर; मूळ रा. वडगावपीर, ता. आंबेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. करंदी (ता. शिरूर) येथे मंगळवारी (दि. 14) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

दीपक आदक हे केंदूर रस्त्याने जात पऱ्हाडवाडीजवळ पत्नी वर्षाला कार (एमएच १४ डीटी २१६२) शिकवत असताना समोरून दुचाकी आल्यामुळे गोंधळलेल्या वर्षाने कारच्या ब्रेकऐवजी एक्सीलेटर पाय ठेवला. यामुळे कारचा वेग वाढून वर्षा यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार शेजारील विहिरीमध्ये जाऊन कोसळली.

या वेळी दीपकने स्वतः कारमधून बाहेर निघून पत्नीला देखील बाहेर काढले आणि विहिरीतील पाईपला पकडून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारी रस्त्याने जाणारे काही नागरिक या ठिकाणी धावून आले. त्यांनी दीपक आदक व वर्षा या दोघांना बाहेर काढले. मात्र, विहिरीतून बाहेर काढल्यानंतर वर्षाची कसलीही हालचाल होत नव्हती.

घटनेची माहिती मिळताच करंदीच्या पोलिस पाटील वंदना साबळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल ढेकणे, पोलिस हवालदार संदीप कारंडे, पोलिस नाईक विकास पाटील, राहुल वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संदीप कारंडे व विकास पाटील करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button