

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात ऑगस्टमध्ये महिला व बालकल्याण आणि आरोग्य विभागाने कुपोषित बालक शोध व आरोग्य तपासणी मोहीम राबवली. त्यात तब्बल 253 तीव्र आणि 1 हजार 603 बालके मध्यम कुपोषित आढळली आहेत. या कुपोषित बालकांना शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार आहार दिला जात आहे.
कोरोनामुळे लॉकडाउन असल्यामुळे नागरिकांना बाहेर पडता येत नव्हते, तर दुसरीकडे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधितांच्या सेवेत होती. त्यामुळे माता व बालकांची नियमित आरोग्य तपासणी झाली नाही. तसेच, गरोदर मातांना आणि बालकांना दिला जाणारा पोषक आहार मिळाला नाही. त्यामुळे आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे ऑगस्टमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जिल्हा धडक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 253 तीव्र कुपोषित आणि 1 हजार 603 बालके मध्यम कुपोषित आढळली आहेत. त्यांच्यावर आरोग्य आणि महिला बालविकास विभागाचे लक्ष आहे.
अतिकुपोषित असलेल्या मुलांवर स्थानिक ग्रामपंचायतींचे विशेष लक्ष असून, दररोज अंगणवाडी सेविका त्या मुलांना दिल्या जाणार्या आहाराची माहिती घरी जाऊन घेत आहेत. मध्यम आणि तीव— स्वरूपाच्या कुपोषित मुलांना 60 दिवसांचा पोषक आहार पुरवण्यात आला आहे. मुलांना कशा पद्धतीने आहार दिला पाहिजे, याची संपूर्ण माहिती पालकांना देण्यात आली असून, त्या मुलांमध्ये सुधारणा होत असल्याचा दावा महिला व बालविकास विभागाने केला आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील 3 लाख 28 हजार 680 बालकांपैकी आतापर्यंत एक लाख 99 हजार 566 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अंगणवाड्यांच्या ठिकाणी या तपासण्या होत आहेत. अंगणवाडी सेविका आणि तालुका आरोग्य अधिकार्यांच्या अखत्यारित तपासण्या केल्या जात आहेत. 24 नोव्हेंबरपासून शिबिराला सुरुवात झाली आहे. ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
''बालकांच्या आरोग्य तपासणी मोहिमेच्या माध्यमातून जिल्हा कुपोषित व आजारी मुलांचाही शोध घेतला जात आहे. मुलांच्या आरोग्याची माहिती स्पॉफ्टवेअरद्वारे संकलित केली जात आहे. ही माहिती भविष्यात मुलांवर उपचार करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.''
– जे. बी. गिरासे, महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.
हेही वाचा