बिपीन रावत यांची त्यांच्या मूळ गावी घर बांधण्याची इच्छा राहिली अपुरी! | पुढारी

बिपीन रावत यांची त्यांच्या मूळ गावी घर बांधण्याची इच्छा राहिली अपुरी!

पुढारी ऑनलाईन डेस्क

तामिळनाडूतील कुन्नूर वनक्षेत्रात बुधवारी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी लष्कराचे ‘एमआय 17 व्ही 5’ हे हेलिकॉप्टर कोसळले. त्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका तसेच लष्कराचे 12 अधिकारी होते. पैकी बिपीन रावत, मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तामिळनाडूतील या दुर्घटनेनंतर बिपीन रावत यांच्या उत्तराखंडमधील सैणा या त्यांच्या मूळ गावात राहणारे त्यांचे काका भरत सिंह रावत (वय 70) यांनी अंत्यत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी बिपीन रावत यांची एक इच्छा बोलून दाखविली आहे. बिपीन रावत येत्या एप्रिलमध्ये गावी येणार होते. येथे त्यांना घर बांधायचे होते. पण त्यांची ही इच्छा अपुरी राहिली, असे भरत सिंह रावत यांनी सांगितले.

पौडी जिल्ह्यातील रावत यांच्या मूळ गावात केवळ त्यांच्या काकांचे कुटुंबीय राहतात. जनरल रावत यांना त्यांच्या गावाची खूप ओढ होती. अधूनमधून ते फोनही करत होते. जनरल रावत यांनी त्यांच्या काकांना सांगितले होते की मी एप्रिल २०२२ मध्ये गावी येणार आहे. गावात मला घर बांधायचे आहे. पण त्यांची ही इच्छा अपुरी राहिली, असे जनरल रावत यांच्याबाबत सांगताना भरत सिंह रावत यांना अश्रू आवरले नाहीत.

सेवेतून निवृत्त झाल्यानंतर घर बांधायचे आणि काही क्षण गावातील शांत वातावरणात व्यतित करण्याची त्यांची इच्छा होती. जनरल रावत हे लष्करप्रमुख झाल्यानंतर २०१८ मध्ये गावी आले होते. काही वेळ थांबल्यानंतर ते त्याच दिवशी गावातून माघारी परतले. त्यांनी गावात आल्यानंतर कुलदैवताची पूजा केली. त्याच दिवशी त्यांनी गावात घर बांधण्याची इच्छा बोलून दाखविली होती, अशा भावना भरत सिंह रावत यांनी व्यक्त केल्या.

बिपीन रावत खूप दयाळू होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर गरीब लोकांसाठी काही तरी करणार असून जेणेकरुन त्यांची आर्थिक स्थिती चांगली होईल, असे ते नेहमी सांगायचे, असे म्हणत त्यांच्या काकांनी त्यांच्या आठवणी जाग्या केल्या.

बिपीन रावत यांच्यावर लष्करी इतमातात उद्या शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

हे ही वाचा :

Back to top button