पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेने सदासर्वदा उड्या कशा मारायच्या हे दाखवून दिले आहे. ममता बॅनर्जी आल्या की त्यांना तुमचे बरोबर आहे म्हणायचे. राहुल गांधीना भेटल्यावर तुमच्या शिवाय काय होणार, असे म्हणायचे. यालाच उड्या मारणे असे म्हणतात, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर केली. त्यांनी बुधवारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीला अडीच वर्ष असताना सर्वानी एकत्र येण्यासाठी कोणी रोखले नाही. त्यांच्यात नेता कोण यावरून संभ्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ काम करत आहेत. 2019 मध्येही त्यांची एकजूट होतीच. तेव्हाही भाजपा जिंकली. भाजपा एकजूट युपीएला टक्कर देण्यासाठी केव्हापासूनच तयार आहे. भाजपाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 418 जागा मिळतील असा आमचा सर्व्हे सांगत असल्याचे ते म्हणाले.
आताचे सरकार कायद्याचा अभ्यास नसणारे गोंधळी सरकार आहे. 'नाचता येईना अंगण वाकडे' अशी सरकारची परिस्थिती झाली आहे. त्यांना ओबीसींना पाच वर्षांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थापासून दूर ठेवायचे असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. त्याबरोबर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक घेण्याचे आवाहन केले.
मागील दोन दिवसात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत सोनीया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतल्याच्या मुद्यावर पाटील यांनी, 'त्यांना अडवलंय कुणी' असे भाष्य केले. प्रशांत किशोर यांचा सल्ला ऐकायचा नसेल तर… 'आशेवरच माणूस जगतो' अशी खोचक टिकाही त्यांनी केली.
सवाई गंधर्व महोत्सवाला 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी मिळावी यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. उपस्थितीला 25 टक्के बंधन असल्याकारणाने हे बंधन शिथिल करावे अशी मागणी त्यांनी केली. तीन वर्षापूर्वी एल्गार परिषदेनंतर शनिवारवाड्यावरील सामाजिक व सांस्कृतीक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली होती. परंतु येथे होणार्या कार्यक्रमांना सरसकट परवानगी न देता तीन जणांची कमिटी करून कमिटीच्या छाननी नंतर परवानगी द्यावी, अशी देखील मागणी पाटील यांनी पोलिस आयुक्तांना केली.
आम्हाला सरकारी कर्मचारी म्हणण्याबरोबरच त्यांच्या प्रमाणे सेवा सुविधा मिळाव्यात अशी एसटी कर्मचार्यांची मूळ मागणी आहे. संप इतके दिवस खेचला गेल्याने महाराष्ट्रातील जनतेचे हाल होत आहेत. 60 पेक्षा जास्त एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मेस्मा लावून हजारो जणांची कुटुंब रस्तावर आणून तुम्हाला काय आनंद मिळणार, असा सवालही पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
आरोग्य विभागातील भरती घोटाळ्या प्रकरणी मोठ-मोठे मासे गाळाला लागले आहेत. याप्रकरणात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्यांना सर्वांना अटक झाली पाहिजे. कोरोनाच्या परिस्थितीत सुध्दा 'खा खा'ची भूमिका राबवायची असेल, तर त्यांना चांगलं शासन होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.