नाशिक : परप्रांतीय पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, त्र्यंबकमधील पूजा व्यवसाय चर्चेत | पुढारी

नाशिक : परप्रांतीय पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, त्र्यंबकमधील पूजा व्यवसाय चर्चेत

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : त्र्यंबकेश्वर येथे कालसर्प पूजा करण्यावरून नाशिक येथे दोन परप्रांतीय पुरोहितांमध्ये तुंबळ हाणामारी (priests fight) झाली. या प्रकारामुळे त्र्यंबकेश्वर येथील वेगवेगळ्या तांत्रिक पूजाविधींवरून सुरू असलेला वाद समोर आला आहे. यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक पुरोहित व बाहेरचे पुरोहित यांच्यात अनेकदा वाद होऊन ते पोलीस ठाण्यांपर्यंत गेले आहेत. मात्र, यावेळी परप्रांतीय पुरोहितांमध्ये वाद झाला असून यामुळे पुजाविधी व्यवसायातील अर्थकारणाची चर्चा सोशल मीडियामध्ये होत आहे.

त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबळी, कालसर्प आदी पितृदोषासंबधी पूजाविधी होत असतात. त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक पुरोहित परंपरेने ही पूजा करतात. मात्र, पूर्वी केवळ उच्चभ्रू समाजापुरती मर्यादित असलेली ही पूजा मागील काही वर्षांपासून बहुजन समाजातील नवशिक्षितांपर्यंतही पोहोचली आहे. यामुळे या पुजाविधीचे साहित्य विक्रेते, पुरोहित यांचे दिवस बदलून त्र्यंबकेश्वरचे अर्थकारण बदलले आहे. या पुजाविधी संपूर्ण भारतात केवळ त्र्यंबकेश्वर येथेच केल्या जात असल्याचा प्रचार जोरदारपणे झाला असून स्थानिक ज्योतिषांकरवी त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबळी, कालसर्प हे पूजाविधी करण्यास प्रवृत्त करण्याचा फंडा राबवला जात आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर येथे रोज हजारो लोक पूजाविधीसाठी येत असतात. या पूजाविधीवर त्र्यंबकेश्वरची अर्थव्यवस्था उभी असून समाजाच्या सर्व घटकांना यातून रोजगार उपलब्ध होत आहे. (priests fight)

पूजा करण्यासाठी येणाऱ्या यजमानांची गर्दी वाढल्यामुळे स्थानिक पुरोहितांनी बाहेरगावच्या आपल्या नातेवाईकांच्या मुलांना बोलावून घेऊन त्यांच्याहस्ते पुजाविधी करण्याला प्राधान्य दिले. त्यांना पांतस्थ म्हणून संबोधले जाते. कालांतराने पांतस्थ व स्थानिक त्यांच्याच मतभेद झाल्याने या बाहेरगावच्या मुलांनी स्वता: स्वतंत्र पुजा सांगण्यात सुरवात केली. हळूहळू या पांतस्थांनी स्वताचे ग्राहक निश्चित केल्यामुळे स्थानिकांना त्याचा फटका बसू लागल्याने मागील काही वर्षांपासून त्र्यंबकेश्वर येथे स्थानिक पुरोहित व पांतस्थ यांच्यात वादाच्या (priests fight) अनेक घटना घडल्या.

पुरोहित संघाने दबाव आणून त्र्यंबकेश्वरमध्ये पूजा सांगण्यासाठी या पांतस्थांना कोणीही जागा देऊ नये, यासाठी दबाव आणून त्यांची कोंडी केलेली आहे. या पांतस्थांमध्ये राज्यातील पुरोहितांची संख्या अधिक असली तरी काही परप्रांतीय पुरोहितही काही आखाडे, मठ यांच्या माध्यमातून जागा मिळवून व्यवसाय सुरू केला आहे. त्यातील दोन भावांमध्येही एकमेकांचे ग्राहक पळवण्यावरून झालेल्या वादाचे (priests fight) रुपांतर अगदी हाणामारीत झाल्याचा प्रकार नाशिकमध्ये नुकताच घडला.

Back to top button