पुणे पुढारी वृत्तसेवा : लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करत गळा आवळून पतीचा खून केला. त्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव देखील रचला.
एवढेच नाही तर मृतदेह बाथरुमध्ये लटकवला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून ती दोन दिवस घरातून दुसरीकडे गेली. मात्र अंत्यसंस्काराच्यावेळी मुलीने बाबाला आईने मारल्याची माहिती इतर नातेवाईकांना दिली. त्यानंतर खूनाच्या घटनेला वाचा फुटली.
दीपक बलवीर सोनार (वय.36,रा. 606 गुरुवार पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.12) रात्री साडे अकराच्या सुमारास 606 गुरुवार पेठ परिसरात घडली आहे. याप्रकरणी, खडक पोलिसांनी पत्नी राधिका दीपक सोनार (वय.34,रा. गुरुवारपेठ) हिला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सोनार हा येथील एका जुन्या वाड्यात रखवालदाराचे काम करतो. तो पत्नी व मुलगी सोबत वास्तव्यास होता. राधिका ही मध्यवस्तीतील एका कपड्याच्या दुकानात काम करते. दीपक याला दारूचे व्यसन होते. त्यातूनच पत्नी कामावरून घरी रात्री उशीरा आल्यास तो संशय घेत असे. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते.
सोमवारी (दि.12) रात्री राधिका कामावरून आल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यावेळी तिने दीपक याला लाकडी बॅटने मारहाण केली. त्यानंतर त्याचा जोरात गळा दाबला. त्यामध्ये दीपकचा त्यात मृत्यू झाला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून राधिकाने दीपकचा मृतदेह उचलून बाधरूमध्ये दोरीने लटकला.
दोन दिवस ती बाहेर गेली. परत आल्यानंत तीने पतीने गळफास घेतल्याचा गाजावाजा केला. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. राधिका पती दिपकला मारहाण करत असताना त्यांची मुलगी घरात होती. तिने हा सर्व प्रकार पाहिला होता.
दरम्यान अंत्यसंस्काराच्यावेळी दीपक याच्या मुलीने आईच्या कृत्याचा भांडाभोड करत वडिलांचा खून तिने केल्याचे इतर नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून आरोपी महिलेला ताब्यात घेतले. पुढील तपास खडक पोलिस करत आहेत.
महिलेने पतीचा खून केल्यानंतर मृतदेह बाथरुमध्ये लटकवून, आत्महत्येचा बनाव रचला होता. मात्र अत्यंसंस्काराच्यावेळी त्यांच्या मुलीने पप्पाला आईने मारल्याचे इतर नातेवाईकांना सांगितले. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार तपास करून आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक खडक