पुढारी ऑनलाइईन डेस्क : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची नुकतीच बदली झाली. दौलत देसाई यांना वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागात संयुक्त सचिवपदावर बढती मिळाली आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सुखद आणि दु:खद काळासाठी मोठे योगदान दिले आहे.
२०१९ चा पूर असो किंवा कोरोना काळातील गंभीर स्थितीवर असो त्यांनी कोल्हापुरकरांची मोठ्या धैर्याने साथ दिली. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कधीही सत्कार स्वीकारला नाही. यावर वाचन कट्टाचे संघटक युवराज कदम यांनी फेसबुकवर पोस्ट लिहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
प्लीज..! सत्कार नको हे वाक्य आहे, कोल्हापूरचे मावळते जिल्हाधिकारी आदरणीय दौलत देसाईसाहेब यांचे. पूर परिस्थिती असो अथवा कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न. या प्रश्नांची सोडवणूक केलेबद्दल देसाई साहेबांचे सत्कार करण्यासाठी अनेक संस्था व संघटना या नेहमी विविध कार्यक्रमांचे आयोजन करायच्यात.
अशा कार्यक्रमांना साहेब यायचे पण सत्कार घ्यायला मात्र नकार देत असत. याचे कारण मला काही दिवस कळाले नव्हते. आमच्या वाचनकट्टा संस्थेकडून युथ आयकॉन २०२१ साठी साहेबांना सत्कार स्विकारण्याची विनंती केली. त्यावेळी सुद्धा साहेबांनी एक प्रकारे नकार दिला होता.
पण माझ्या हक्काच्या हट्टाला मान ठेवून प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांना सत्कार स्विकारायला पाठवले. पण सत्कार न स्विकारण्याचे कारण मात्र कळत नव्हेत. शेवटी हे कारण एका कार्यक्रमात साहेबांनी बोलून दाखविले.
आरोग्य विभागाच्या एका राष्ट्रीय कार्यक्रमात देसाईसाहेब प्रमुख पाहुणे म्हणून होते. त्यावेळी त्या विभागाला मनोमन वाटले की साहेबांचा सत्कार आपल्याकडून व्हावा. तसे त्यांनी माईकवर पुकारले सुद्धा. पण साहेबांनी लगेच इकडून सांगितले.
'प्लीज..!सत्कार नको'. संयोजकानी खूप आग्रह केल्यानंतर साहेबांनी ते शाल, सन्मानचिन्ह आणि श्रीफळ हातात घेतले आणि तसेच टेबलवर ठेऊन दिले. नंतर मनोगतात साहेबांनी सत्कार न स्वीकारण्यासाठी मागील भावना व्यक्त केली.
साहेब म्हणाले, 'कोरोनाच्या महाभंयकर संकटात शेकडो लोक मरण पावले आहेत. इतके लोक मरत असताना मी सत्कार कसा काय घेऊ शकतो? मला मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबाबद्दल प्रचंड वेदना होताहेत, दुःख होते, मी आतून पूर्ण चिंतित आहे.व्यथित आहे; म्हणून मी कोणतेच सत्कार स्वीकारत नाही. 'यावर पूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. या मनोगतामध्ये साहेबांची सत्कार न स्वीकारण्याची भावना मला कळाली.
देसाई साहेब जसे कोल्हापूरला हजर झाले तसे कोल्हापूरचा पूर असेल किंवा सध्याचा कोरोना या संपूर्ण महासंकटात एक देवदूतासारखेच कोल्हापूर जिल्ह्याला साहेबांनी सांभाळल.
स्वतःसाठी सुट्टी, खासगी कार्यक्रम ह्या गोष्टीच त्यांच्या दिनक्रमात नसायच्या.कोरोनाच्या काळात तर दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय रात्री दोन, कधी तीन, कधी चारवाजेपर्यंत एमआयडीसी परिसरातील ऑक्सीजन प्लांटवरती साहेब स्वतः जातीने उभे राहायचेत.कोरोनातील जवळजवळ पंधरा महिन्याच्या कालावधीत सुट्टी न घेता साहेब सेवेत राहिले.आठदहा दिवसापूर्वी तब्बेत बिघडल्यामुळे साहेब रजेवर गेले. यातच आता त्यांची बदली मुंबईला झाली.
महापालिकेचे कृतीशील व कार्यातत्पर तत्कालीन आयुक्त मल्लिनाथ कल्लशेट्टी साहेबांची बदली यासंकटमय काळातच झाली. यामुळे प्रत्येक कोल्हापुरवाशी दुखावला होता; पण देसाईसाहेब असल्याने थोडा सुखावला होता.
कारण पूर आणि कोरोना या संकटात हे दोन अधिकारी म्हणजे कोल्हापूरसाठी जणू संकटमोचकच होते. आज देसाईसाहेब बदली होऊन मुंबईला जात आहेत. पण त्या 'प्लीज..! सत्कार नको' या भावनेतच तीन वर्षे कधी निघून गेली कळली नाहीत.
साहेबांचा मोठ्ठा सत्कार व्हावा असे माझ्यासह अनेक कोल्हापुरातील कार्यकर्ते, नागरिक यांना वाटते.पण कोरोनाला नियती ज्यावेळी हारवेल त्यावेळीच आदरणीय देसाई साहेबांसारखे कृतीशील, संवेदनशील अधिकारी सत्कार स्विकारतील.
असे असलेतरी कोल्हापूरसाठी साहेबांनी केलेले कार्य हे कोल्हापूरकर कधीच विसरणार नाही.साहेबांनी सत्कार स्विकारले नसले तरी अनेक गोरगरीब जनतेचे आशीर्वाद मात्र त्यांनी न स्विकारताच नियतीने त्यांच्या पारड्यात टाकले आहेत.
आदरणीय साहेबांना कोल्हापूरच्या जनतेचे आशीर्वाद पुढील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी फलदायी ठरतील याची मला मनोमन खात्री आहे.आदरणीय देसाईसाहेबांच्या कार्याला आमचा सलाम…
वाचन कट्टाचे समन्वयक युवराज कदम यांच्या फेसबुक पोस्टवरून