जलसंकट : मांजरीकरांचा पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष संपता संपेना! | पुढारी

जलसंकट : मांजरीकरांचा पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष संपता संपेना!

प्रमोद गिरी

मांजरी : यंदाचा कडक उन्हाळा आणि अंगाची लाहीलाही होत असताना मांजरी परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून घरे घेतली. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष काही संपता संपेना, अशी स्थिती आहे. त्यातच निवडणुका सुरू असल्याने लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकार्‍यांना हा मुख्य प्रश्न सोडविण्यासाठी वेळ नाही. खासगी टँकरने पाणी घेऊनही पाण्याची कमतरता जाणवत असल्याने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

मांजरी परिसरातील कूपनलिकांनी तळ गाठल्याने मांजरीकरांना सध्या पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महादेवनगर, घुलेवस्ती, गोपाळपट्टी, मुंढवा रस्ता, मांजरी फार्म या भागांत गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पुढील पाच महिने कसे जातील, या चिंतेने नागरिकांना हैराण केले आहे. त्यामुळे मांजरी बुद्रुकमधून पालिकेविरोधात असंतोष वाढू लागला आहे.

मोठ्या प्रमाणात वाढत असलेले नागरीकरण, कूपनलिकांची वाढती संख्या, कमी होत असलेले बागायती क्षेत्र, या सर्वांचा परिणाम येथील भूगर्भातील पाणीसाठ्यावर झाला आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी बाराही महिने उपलब्ध होणारे पाणी आता सहा महिन्यांवर आले आहे. हिवाळा संपताच फेब्रुवारी-मार्च महिन्यापासूनच कूपनलिकांनी तळ गाठला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्यासाठीही टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. तेही वेळेवर येत नसल्याने रात्री- अपरात्री महिला व पुरुषांना पाण्यासाठी दूरवर फिरावे लागत आहे.

मांजरी फार्ममधील नागरिकांचा संताप

येथील सादबाबाग, झांबरे-बहिरटवस्ती, त्रिमूर्तीनगर, मोरे कॉलनी, यश संकुल, तुपे पार्कमधील नागरिकांनी पाणी हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांना निवेदन देऊन पाणीपुरवठ्याची मागणी केली. प्रा. अरुण झांबरे, उमेश झांबरे, सुधाकर बहिरट, गणेश जाधव, सतीश पाटोळे, उषा सुवर्णा फुलसुंदर, अर्चना खेडेकर आदी उपस्थित होते. दहा ते पंधरा दिवसांत पाणीपुरवठा न झाल्यास सातत्याने आंदोलन करावे लागते.

मीरा रामलिंग, रोहिणी कुदळे, प्रियंका कापरे, रुतुजा जगताप, रुचिता कापरे, पंकज घुले, सुरज घुले, विलास घुले, प्रा. अरुण झांबरे, मधुकर कवडे, सुनीता ढेकणे, राणी लोंढे, कल्याणी जगताप, मंगल तिकोने, सागर वाघवले आदींनी पाणीटंचाईबाबत व्यथा मांडल्या.
गणराज सोसायटी, गावठाण, मांजरी बुद्रुक, भापकरमळा, श्री स्वामी समर्थ कॉलनी, कुंजीरवस्ती, सैनिकनगर कॉलनी, झेड कॉर्नर, बेलेकरवस्ती, किरण बेलेकर, अनाजी वस्ती, घुलेनगर या ठिकाणी भर उन्हात टँकरची वाट पाहावी लागते. तरीही पाणी पिण्यासाठी तर कमीच, आंघोळ व इतर वापरासाठी पाणी मिळत नाही, अशी या ठिकाणची परिस्थिती आहे, असे गोपाळपट्टी भागातील महिला रोहिणी कुदळे व ऋतुजा जगताप यांनी सांगितले.

समाविष्ट गावांतून पाण्याच्या समस्येच्या तक्रारी येत आहेत. त्याबाबतची माहिती मुख्य कार्यालय व लष्कर पाणीपुरवठा विभागाकडे पाठविली आहे. पाणी प्रश्नाची परिस्थिती मांडली आहे. त्यावर निर्णय घेतला जाईल. –

बाळासाहेब ढवळे पाटील, सहायक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय

सध्या उन्हाळा खूप आहे. पिण्याचे पाणी कमी पडू नये, यासाठी नागरिकांची मागणी लक्षात घेता सुमारे 35 पिण्याच्या पाण्याचे टँकर मांजरी परिसरातील वस्त्या व कॉलनी या ठिकाणी पुरविले जाते.

– निखिल रंधवे, शाखा अंभियंता, पाणी पुरवठा मनपा विभाग, पुणे

खासगी टँकरची चलती

पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने नागरिकांना स्वतंत्रपणे खासगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी पाचशे-सहाशे रुपयांना मिळणार्‍या टँकरसाठी सध्या हजार ते बाराशे रुपये मोजावे लागत आहेत. मागणी वाढल्याने टँकर सांगितल्यानंतर तो दोन- तीन दिवसांनी येतो. पाण्यासाठी हजारो रुपये द्यावे लागत असल्याने गरीब कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. गावठाण हद्दीत पालिकेकडून टँकरने होत असलेला पाणीपुरवठा पुरेसा नाही. त्यामुळे नागरिकांना इतरत्र पाण्यासाठी पळावे लागत आहे.

ग्रामस्थांची नाराजी

गाव पालिकेत समाविष्ट होऊन अडीच वर्षे उलटली आहेत. तरीही पालिकेला गावच्या पाण्याचे नियोजन करता आले नाही. यापूर्वी ग्रामपंचायतीकडून राबविली जाणारी यंत्रणा कोलमडून पडली आहे. काही ठरावीक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याच वेळी गावातील अनेक वस्त्यांवरील नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. मिळकतकर आकारणी केली जात असताना पाण्यासारखी मूलभूत सुविधासुद्धा पालिका पुरवू शकत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गावठाणात पाणी टँकर वाढविले

गावठाणातील नागरिकांनी राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांना आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्यांनी 72 घरकुल या ठिकाणी दररोज दोन टँकर पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले. या वेळी सारिका प्रतापे, सुनीता ढेकणे, छकूबाई अंकुशराव, मंगल तेलंगे, रंजना रोकडे, सखूबाई दहिफळे, पिंकी दिवार, नंदा भोसले आदींनी सांगितले. मात्र, ते अनियमित असल्याचे साळवे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button