गावांना दिलासा : वरवंडच्या व्हिक्टोरिया तलावात आवर्तन सुरू; 200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग | पुढारी

गावांना दिलासा : वरवंडच्या व्हिक्टोरिया तलावात आवर्तन सुरू; 200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

खोर : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावात खडकवासला धरणसाखळीतून कालव्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. तलावावर अवलंबून असणार्‍या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत व्हिक्टोरिया तलाव पूर्णतः आटला होता. परिणामी, या भागातील पाणी योजना बंद पडल्या. व्हिक्टोरिया तलावावर अवलंबून असणार्‍या दौंड तालुक्यातील कुसेगाव, पडवी, खोर, नारायणबेट, देऊळगावगाडा, वरवंड, कडेठाण, कानगाव तसेच गिरीम व पाटस हद्दीतील गावांना याचा मोठा फटका बसला.

पाण्यासाठी पंचायत समितीकडून ग्रामीण भागाला टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. मागील आठवड्यात पाण्याची समस्या गंभीर बनल्याने वरवंड ग्रामपंचायतीने आंदोलन करीत खडकवासला कालव्याचे पाणी तलावात सोडले. हा पाणी प्रश्न पेटल्यावर याची दखल पाटबंधारे विभागाने घेत वरवंडच्या तलावात पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

दि. 26 तारखेपासून खडकवासला धरणसाखळीतून कालव्याद्वारे वरवंडच्या व्हिक्टोरिया तलावात 200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पाणी कधीपर्यंत सुरू राहणार, याची निश्चितता नाही. मात्र, सध्यातरी तलावात पाणी आल्याने ग्रामीण भागातील गावांना याचा दिलासा मिळणार आहे. आजपर्यंत 33 एमसेफ्टी पाणी आले आहे.

– राहुल वर्‍हाड, शाखाधिकारी, खडकवासला जलसंपदा विभाग, वरवंड

तलाव पूर्णक्षमतेने भरेपर्यंत पाणी बंद करू नये. 50 टक्के तलाव भरल्यानंतर बारामती तालुक्याला जनाई-शिरसाई योजनेला पाणी उचलले जात आहे, ते बंद करावे. पाण्याची निश्चिती व पुढील दोन महिन्यांत पाऊस झाला नाही, तर त्या कालावधीत राखीव पाणीसाठा ठेवावा. यासंदर्भात शाखा उपअभियंता सुहास साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असून, आम्ही वरवंड ग्रामपंचायतीचे निवेदन देखील पाटबंधारे विभागाला देणार आहे.

– तानाजी दिवेकर, सरचिटणीस, भाजप पुणे जिल्हा

हेही वाचा

Back to top button