शिकारीला गेलेली बिबट मादी, स्वत:च अडकली खुराड्यात.. | पुढारी

शिकारीला गेलेली बिबट मादी, स्वत:च अडकली खुराड्यात..

निमोणे : पुढारी वृत्तसेवा : शिंदोडी (ता. शिरूर) येथील शेतकरी मच्छिंद्र सोनवणे यांच्या घरासमोरील कोंबड्यांच्या खुराड्यात शनिवारी (दि. 20) पहाटे शिकारीच्या शोधात असलेली बिबट मादी शिरली. त्यामुळे कोंबड्या खुराड्याबाहेर पळाल्या. कोंबड्यांच्या आवाजाने जागे झालेले शेतकरी सोनवणे हे खुराड्याजवळ गेले असता त्यांना बिबट मादी दिसली. त्यांनी प्रसंगावधान राखत खुराड्याचे दार बाहेरून बंद केले. सोनवणे यांनी ही बाब शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक विठ्ठल दुर्गे यांना सांगितली.

दुर्गे यांनी तातडीने वन विभागाच्या कर्मचार्‍यांशी संपर्क साधला. जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन चवणे, त्यांचे सहकारी आकाश डोळस, वैभव नेहरकर, शिवाजी मोघे, शिरूरचे वनपाल गणेश म्हेत्रे, वनरक्षक संतोष भुतेकर, वन कर्मचारी दिनेश गोरड, नवनाथ गांधले, संपत पाचुंदकर हे शिंदोडी येथे आले. यांनी खुराड्यात अडकलेल्या बिबट्याच्या मादीला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर तिला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात नेण्यात आले. या मादीचे अंदाजे वय दोन वर्षे असल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button