तमाशा पंढरीत विनापरवाना वीजजोड घेणे पडले महागात; ४५ हजारांचा भुर्दंड | पुढारी

तमाशा पंढरीत विनापरवाना वीजजोड घेणे पडले महागात; ४५ हजारांचा भुर्दंड

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव येथील तमाशा नगरीमध्ये विविध फड मालकांनी राहुट्या उभारल्या आहेत. मात्र या राहुट्यांमध्ये विनापरवाना वीजजोड घेणे या फड मालकांना महागात पडले असून ४५ हजार ५८० रुपयाचा दंड भरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव नगरीमध्ये विविध फडमालकांनी एकूण ३५ राहुट्या उभारल्या असून येथे विजेचा पुरवठा विनापरवाना केला म्हणून ४५ हजार ५८० रुपयांचा दंड करण्यात करण्यात आल्याची माहिती नारायणगाव कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता सचिन बनकर यांनी दिली. बनकर यांनी सांगितले की, आनंद बबन दळवी यांनी या तमाशा राहुट्यामध्ये वीजजोड मिळावा म्हणून दि. ९ मार्च रोजी अर्ज दिला होता. त्याबाबतचे कोटेशन देखील त्यांना देण्यात आले होते. परंतु त्यांनी कोटेशन न भरता परस्पर वीजजोड घेतले. वीज वितरण कपंनीचे नारायणगाव शाखा अभियंता राजेश घोडे यांनी या राहुट्यांना दि. २७ मार्च रोजी भेट देऊन पाहणी केली असता विजेचे अधिकृत कनेक्शन न घेता विनापरवाना वीज जोडणी केल्याचे लक्षात आले. त्यांनी पंचनामा करून वायर जप्त केली.

दरम्यान तमाशाच्या राहुट्यामध्ये विजेचे कनेक्शन मिळावे याबाबतचा ज्या तारखेपासून अर्ज केला होता त्या दिवसापासून २७ मार्चपर्यंत ८९६ युनिटचा वापर केला. त्यामुळे ४५ हजार ५८० रुपयांचा दंड करण्यात आला. दंडाची रक्कम संबंधितांनी दि. २८ मार्च रोजी भरली. तसेच नवीन कनेक्शनचे डिपॉझिट देखील ४ हजार २३० रुपये त्यांनी तेव्हाच भरले. आता त्यांना रिसर्च विजेचे कनेक्शन दिले असल्याची माहिती सचिन बनकर यांनी दिली.

आम्ही ऑनलाइन पद्धतीने अनामत रक्कम भरली होती. वीज वितरण कंपनीच्या वायरमनकडून वीजजोड देणे तेवढे बाकी होते. जेवढे दिवस आम्ही वीजेचा वापर केला तेवढ्या रीडिंगच्या बिलाची रक्कम आम्ही जमा करून आता रीतसर वीजजोड घेतला आहे. वीज वितरण कंपनीचे आम्हाला नेहमी सहकार्य असते.
– संभाजीराजे जाधव, फड मालक

Back to top button