Vijay Shivatare : बारामतीतून १२ एप्रिलला अर्ज भरून विरोधकांचे बारा वाजविणार: विजय शिवतारे | पुढारी

Vijay Shivatare : बारामतीतून १२ एप्रिलला अर्ज भरून विरोधकांचे बारा वाजविणार: विजय शिवतारे

सासवड: पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघात पवारविरोधात आघाडी उघडलेले पुरंदरचे माजी आमदार व शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे १ एप्रिलरोजी सासवडच्या पालखी तळावरून आपल्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. आता माघार नाही १२ एप्रिलरोजी १२ वाजता अर्ज भरून विरोधकांचा बारा वाजवणार, असा सूचक इशारा शिवतारे यांनी दिला आहे. सासवड येथे ते कार्यकर्त्यांशी बोलत होते. Vijay Shivatare

ते पुढे म्हणाले की, १२ एप्रिलच्या आधी बारामती लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहे. त्याची सुरुवात सासवडमधून केली जाणार आहे. मला फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हरवायचे आहे. मी शरद पवार यांचा माणूस आहे, असा गैरसमज अजित पवार गटाकडून पसरवला जात आहे. परंतु, असा नालायक पणा मी कधीच करणार नाही. मी लढतोय ते जिंकण्यासाठीच, ही लढाई दोन्ही पवारांच्या विरोधात आहे, असे शिवतारे यांनी स्पष्ट केले. Vijay Shivatare

शरद पवार आणि अजित पवार यांना देखील माहित आहे, विजय शिवतारे कोण आहे. रावणाचा वध करण्यासाठी शिवतारे ठाम आहे, असे सांगून ते म्हणाले की, ग्रामीण भागात दहशतवाद पवारांनी पसरविला आहे. माझ्या माणसांना त्रास दिला जात आहे. अजित पवारांनी खूप पापे केली आहेत. संपूर्ण राज्याला हा ग्रामीण दहशतवाद हा शब्द माहिती पडेल. ७० वर्षात यांनी फक्त घुसखोरी केली आहे. ईस्ट इंडिया कंपनी गेली आता पवारांची कंपनी आली आहे.

शरद पवार आणि अजित पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रम्हराक्षस दोघांचा खात्मा करायचा आहे. यांनी प्रचंड अन्याय केले आहेत. कपट कारस्थानी पवारांनी अनेकांना संपवले आहे. आता यांना बाजार दाखवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत शिवतारे यांनी दोन्ही पवारांवर घणाघाती हल्ला चढविला.

लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मला जनतेने आशीर्वाद दिला आहे. अनेक छुपे आशीर्वादही आहेत. सर्व पक्षीय नेते माझ्यासोबत आहेत. अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे लोक देखील माझ्या बरोबर येतील. अजित पवार यांचे राजकारण स्वार्थाचे आहे. मला धमक्या दिल्या जात आहेत. मी केंद्र सरकारकडे तक्रार करणार आहे. माझ्या जीवाला धोका आहे, असे त्यांनी सांगितले.

नेत्यांकडून दबाव येईल, असे सांगितले जात आहे. मी सगळ्या नेत्यांना सांगत आहे की, ही लढाई मला लढू द्या. अजित पवार नावाचा विंचू आधी आम्हाला डसला आणि आता महादेवच्या (नरेंद्र मोदींच्या) पिंडीवर जाऊन बसला आहे. मी जनतेसाठी फाशीवर जायला तयार आहे. मला आजही एकनाथ शिंदे आदरस्थानी आहेत.

हेही वाचा 

Back to top button