अशी घ्याल चिमुकल्यांच्या दातांची काळजी; दंतरोगतज्ज्ञांचा सल्ला | पुढारी

अशी घ्याल चिमुकल्यांच्या दातांची काळजी; दंतरोगतज्ज्ञांचा सल्ला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्या लहान मुलांच्या दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. दात खराब होणे आणि दात किडण्याच्या समस्या लहान मुलांमध्ये वारंवार भेडसावतात. लहान मुलांच्या वाढत्या वयाच्या काळात दातांच्या अस्वच्छतेमुळे रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे पालकांसह मुलांना दातांच्या अस्वच्छतेबाबतचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असा सल्ला दंतरोग संघटनेच्या तज्ज्ञांनी दिला आहे.

सातत्याने गोड खाणे, दात व्यवस्थित न घासणे आणि दातांची अस्वच्छता यामुळे लहान वयात मुलांचे समोरील दात खराब होतात. त्यामुळे संवाद साधताना ते बर्‍याचदा अडखळतात. परिणामी, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम होताना दिसून येतो. लहान वयातच मुलांच्या दातांच्या तपासणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांमध्ये जनजागृतीचा अभाव आणि दुधाच्या दातांबद्दल असलेले गैरसमज यामुळे मुलांच्या दातांचे आरोग्य निरोगी न राहण्यामागील कारणे आहेत, असे मत दंतरोगतज्ज्ञ डॉ. मनीष चिवले यांनी दिले.

काय काळजी घ्यावी?

मुलांच्या आहारातील गोड पदार्थांचे सेवन नियंत्रित करावे. दातांच्या अस्वच्छतेमुळे मौखिक दुर्गंधी निर्माण होते. आत्मविश्वासावर परिणाम होतो. त्यामुळे दातांच्या स्वच्छतेचे महत्त्व मुलांना पटवून द्यावे. दंतचिकित्सकांकडून दातांच्या आरोग्यासंदर्भात कोणती खबरदारी घ्यावी किंवा कोणते उपाय करावे याबाबत माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. मुले एक-दोन वर्षांची असतानाच ब्रश करण्याची सवय लावली पाहिजे. तीन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना फ्लोराईड आधारित टूथपेस्ट देण्यात यावी. मुलांच्या दातांची नियमित तपासणी केल्यास निगा राखली जाऊ शकते.

पालकांनी मुलांच्या दातांच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे मौखिक स्वच्छता राखण्यास मदत होते. दातांच्या स्वच्छतेमुळे मुलांमधील आत्मविश्वासही वाढतो.

– डॉ. नेहा साळुंखे

हेही वाचा

Back to top button