Pimpri-Chinchwad Crime News : संशयातून आयटी अभियंता तरुणीचा खून झाल्याचे निष्पन्न | पुढारी

Pimpri-Chinchwad Crime News : संशयातून आयटी अभियंता तरुणीचा खून झाल्याचे निष्पन्न

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आपली प्रेयसी दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याचा संशयाचा किडा डोक्यात वळवळल्याने प्रियकराने तिचा गोळ्या झाडून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तसेच, प्रियकराने तब्बल पाच गोळ्या झाडून आपल्या प्रेयसीचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले आहे. ही घटना रविवारी (दि. २९) सकाळी मारुंजी येथे उघडकीस आली आहे. Pimpri-Chinchwad Crime News

वंदना द्विवेदी (वय २६) असे खून झालेल्या आयटी अभियंता तरूणीचे नाव आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋषभ राजेश निगम (रा. लखनौ) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना आणि ऋषभ हे दोघेही महाविद्यालयात असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. वंदनाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून ती हिंजवडी येथे इन्फोसिस कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करीत होती. कंपनीच्या जवळच एका पीजी हॉस्टेलमध्ये राहत होती. ऋषभ हा लखनौमध्ये ब्रोकरचे काम करत होता. दोघेही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते. Pimpri-Chinchwad Crime News

परंतु, वंदना अपेक्षित संवाद करत नसल्याचे ऋषभला वाटत होते. त्यामुळे ती अन्य कोणाच्या तरी प्रेमात पडल्याचा संशय त्याला होता. त्यावरून त्यांच्यात गेल्या चार वर्षांपासून वाद सुरू होते. आरोपी ऋषभने चार-पाच वर्षापूर्वीच एका मित्राकडून पिस्तुल घेऊन ठेवले होते. मनातील संशय वाढत असल्याने ऋषभ २५ जानेवारी रोजी लखनौवरून हिंजवडीत आला. त्याने ओयो टाऊन हाऊस हॉटेलमध्ये खोली बूक केली. वंदना २६ जानेवारी रोजी सायंकाळी लॉजमध्ये ऋषभ याला भेटली. भेटून ती पुन्हा आपल्या हॉस्टेलमध्ये परतली.

ऋषभने दुसर्‍या दिवशी वंदनाला पुन्हा बोलावून घेतले. दोघांनी एकत्र खरेदी केली, सोबत जेवणही केले. २७ जानेवारीरोजी दिवसभर दोघेही एकत्र होते. रात्री साडेनऊच्या सुमारास दोघेही लॉजच्या खोलीत असताना ऋषभने पिस्तुल काढून वंदनाला काही कळायच्या आत तिच्या डोक्यासह शरीरात पाच गोळ्या झाडल्या. वंदना रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर ऋषभ हा काही घडलेच नाही, अशा अविर्भावात रात्री दहाच्या सुमारास खोलीचा दरवाजा बंद करून पसार झाला.

दरम्यान, तो मुंबईच्या दिशेने जात असताना पोलिसांनी नाकाबंदीत त्याच्यावर संशय आल्याने बॅग तपासली. त्यावेळी बॅगेत पिस्तुल आढळून आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हिंजवडीतील घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मुंबईत जाऊन ऋषभ याला ताब्यात घेतले. दरम्यान, ससून रूग्णालयात झालेल्या शवविच्छेदन अहवालात वंदनावर पाच गोळ्या झाडल्याचे निष्पन्न झाले आहे. तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.

Pimpri-Chinchwad Crime News : आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी

हिंजवडी पोलिसांनी आरोपी ऋषभ निगम याला सोमवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. गुन्ह्यातील शस्त्र जप्त करणे, आरोपीची वैद्यकिय तपासणी करणे आणि गुन्ह्यामागील हेतू शोधणे यासाठी सरकारी वकिल विजयसिंह जाधव यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार, न्यायालयाने आरोपीला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपीने ऋषभ निगम याने प्रेमप्रकरण आणि संशयातून आपली प्रेयसी वंदना हिचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. घटनेबाबत सर्व बाजूंनी पोलिस तपास सुरू आहे.

– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी

हेही वाचा 

Back to top button