71st Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: 71 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव; चौथ्या दिवशी गायन-वादन-नृत्याची त्रिवेणी
पुणे: युवा गायक सिद्धार्थ बेलमण्णू यांच्या सुरेल गायकीची झलक, अनुराधा कुबेर यांच्या सुरांची बरसात, पं. रूपक कुलकर्णी यांचे मधुर बासरीवादन, डॉ. भरत बलवल्ली यांची परिपक्व गायकी... अशी अद्वितीय कलाविष्काराची पर्वणी रसिकांना 71व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी अनुभवायला मिळाली. तर, कला रामनाथ यांच्या व्हायोलिन आणि डॉ. जयंती कुमरेश यांच्या सरस्वती वीणा, अशा सहवादनाच्या नादानुभवाने अन् नृत्यकलाकार मेघरंजनी मेधी यांच्या कथक नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली. चौथ्या दिवशी गायन, वादन आणि नृत्याच्या त्रिवेणी संगमाची अनुभूती रसिकांना घेता आली. महोत्सवाला शनिवारी (दि. 13) रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव शनिवारी एकापेक्षा एक अद्वितीय कलाविष्कारांनी रंगला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही महोत्सवाला भेट दिली. चौथ्या सत्राची सुरुवात सिद्धार्थ बेलमण्णू यांच्या सुमधुर गायनाने झाली. त्यांनी राग भीमपलास सादर केला. विलंबित एकतालातील ‘अब तो बडी बेर भयी...’ या रचनेतून एक शांत, करुणामय असा भीमपलास साकारला. रागविस्तार करताना सरगमचा सौंदर्यपूर्ण वापर हेही त्यांचे वैशिष्ट्य ठरले. ‘बीरज में धूम मचाए शाम...’ या बंदिशीतून भीमपलासचा एक वेगळा रंग त्यांनी रसिकांसमोर सादर केला. पंडित भीमसेन जोशी यांनी लोकप्रिय केलेला ‘माझे माहेर पंढरी...’ हा अभंग आणि संत राघवेंद्र स्वामी यांची कन्नड भक्तिरचना सादर करून त्यांनी समारोप केला.
यानंतर गायिका अनुराधा कुबेर यांनी मुलतानी रागाने सुरुवात केली. विलंबित एकतालातील ‘कैसे कर मन समझाऊ...’ ही डॉ. चैतन्य कुंटे यांची रचना, त्याला जोडून डॉ. अरविंद थत्ते यांनी बांधलेला तराणा त्यांनी पेश केला. हा तराणा वैशिष्ट्यपूर्ण होता. प्रतापवराळी या दाक्षिणात्य रागातील ‘बरन साजन सखी...’ ही उस्ताद अमान अली खाँ यांची त्रितालातील रचना, दुर्गा रागातील द्रुत एकतालात बांधलेला त्रिवट सादर करून कुबेर यांनी गायनाचा समारोप केला.
पूर्वार्धात सुरेल रंग भरले ते पं. रूपक कुलकर्णी यांच्या बासरीवादनाने. त्यांनी राग शुद्ध कल्याण सादर केला. मोजक्या स्वरांतून रागरूप यथार्थपणे दर्शवत त्यांनी मांडणी केली. ईशान घोष यांची तबलासाथ सुरू होताच लयकारीचे वैविध्य उलगडत गेले. 11 मात्रांच्या तालातील काहीसे अनवट वादनही त्यातील माधुर्य जपल्याने रसिकांची भरभरून दाद मिळवून गेले. पाठोपाठ द्रुत त्रितालातील रचनेतून पं. रूपक कुलकर्णी यांनी ईशान घोष यांच्यासह लयीच्या नानाविध स्वराकृती साकारल्या. तबल्यासह बासरीचे सवाल-जवाबही दाद मिळवून गेले. सिंदुरा रागातील रचनेने पं. कुलकर्णी यांनी समारोप केला. उत्तरार्धात डॉ. भरत बलवल्ली यांचे गायन रंगले. त्यांनी राग शहाना कानडा सादर केला. ‘मोरे आये कुवर कन्हाई...’ झपतालातील रचना त्यांनी सविस्तर मांडली. त्याला जोडून ‘मंदिरवा में मोरे आज...’ हा द्रुत एकताल ऐकवताना त्यांनी उत्तम दमसास, तयारीच्या तानांचे दर्शन घडविले. त्यानंतर त्यांनी काही रचना सादर करून दाद मिळवली. संगीत मानापमान नाटकातील ‘युवतीमना दारूण रण रुचिर प्रेमसे...’ हे हंसध्वनी रागातील द्रुत एकतालातील नाट्यगीत अतिशय आक्रमकपणे सादर केले.
चौथ्या दिवसाचे आकर्षण ठरले ते कला रामनाथ आणि डॉ. जयंती कुमरेश यांचे व्हायोलिन आणि सरस्वती वीणा सहवादन. त्यांनी राग चारुकेशी सादर केला. त्यांच्या सादरीकरणाला मिळालेली योगेश समसी यांची तबल्याची आणि जयचंद्र राव यांची पखवाजाची साथ खास ठरली. महोत्सवाच्या चौथ्या दिवसाचा समारोप आसाममधील कलाकार मेघरंजनी मेधी यांच्या कथक नृत्यप्रस्तुतीने झाला. त्यांच्या बहारदार नृत्यप्रस्तुतीने रसिकांची मने जिंकली. ‘सवाई’मध्ये सादरीकरणाची संधी मिळणे हा आनंद देणारा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आनंद देशमुख यांचा सूत्रसंचालनाचा विश्वविक्रम
ज्येष्ठ सूत्रसंचालक आनंद देशमुख 33 वर्षांपासून महोत्सवाचे सूत्रसंचालन करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल लंडन येथील ’वर्ल्ड बुक ऑफ रेकॉड्र्स’ या संस्थेने घेतली आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद शनिवारी (दि. 13) ’वर्ल्ड बुक ऑफ रेकॉड्र्स’मध्ये करण्यात आली. या विक्रमाचे प्रशस्तिपत्र आणि मानचिन्ह महोत्सवादरम्यान ’वर्ल्ड बुक ऑफ रेकॉड्र्स’चे महासंचालक विक्रम त्रिवेदी यांनी देशमुख यांना प्रदान केले. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी आणि विश्वस्त शिल्पा जोशी उपस्थित होते.
पत्रपेटीत एक हजाराहून अधिक पोस्टकार्ड
यंदा महोत्सवात राबविण्यात आलेल्या पोस्टकार्ड लेखन उपक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसांतच एक हजाराहून अधिक पोस्टकार्ड पत्रपेटीत जमा झाली आहेत. रसिकांसाठी विनामूल्य पोस्टकार्ड आणि पत्रपेटी ठेवण्यात आली आहे.
व्हायोलीन, सरस्वती वीणावादनातून दुहेरी स्वरयोग
कला रामनाथ यांचे व्हायोलीन आणि डॉ. जयंती कुमरेश यांचे सरस्वती वीणावादन असा दुहेरी स्वरयोग राग चारुकेशीच्या माध्यमातून साधला गेला. आलाप, जोड झाला यातून चारुकेशी रंगतदार झाला. व्हायोलीन आणि सरस्वती वीणा या दोन्ही वाद्यांना अनुकूल तालवाद्ये सोबत असल्याने राग जणू उत्तर हिंदुस्थानी आणि दाक्षिणात्य संगीत प्रवाहासोबत एकरूप होत खुलत गेला. व्हायोलीन आणि सरस्वती वीणा यांच्यासोबत ज्येष्ठ तबलावादक पं. योगेश समसी आणि जयचंद्र राव (पखवाज) यांचे सवालजवाब रसिकांना आनंद देणारे ठरले.

