

पुणे: कथाकथन असो वा परिसंवाद... अशा साहित्य संमेलनातील कार्यक्रमांची झलक रील्सद्वारे पाहायला मिळाली तर साहित्यप्रेमींना आनंद होईलच... हो, हे खरे आहे. सातारा येथे रंगणाऱ्या 99 व्या साहित्य संमेलनातील कार्यक्रमांची झलक साहित्यप्रेमींना रील्सद्वारे पाहायला मिळणार असून, हे रील्स तयार करण्यासाठी सोशल मीडिया टीम तयार करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर ज्यांना संमेलनाला येणे शक्य नाही, त्या जगभरातील साहित्यप्रेमींना उद्घाटनाचा असो वा मुलाखतीचा कार्यक्रम... फेसबुक आणि यू-ट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपणाद्वारे (लाइव्ह) घरबसल्या पाहता येणार आहे.
संमेलनातील प्रत्येक घडामोडीची माहिती देण्यासाठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचीही निर्मिती करण्यात येत आहे. यू-ट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग््राामवर अधिकृत पेज सुरू करण्यात आले आहे. त्यावर 15 डिसेंबरपासून संमेलनाच्या प्रत्येक घडामोडीचे अपडेट्स मिळणार आहेत. इन्स्टाग््रााम पेजवर रील्सद्वारेही साहित्यप्रेमींना कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.
सातारा येथे 1 ते 4 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सध्या जोरदार तयारी सुरू असून, महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहुपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन हे संमेलनाचे आयोजक संस्था आहेत. संमेलनासाठी 15 जणांची सोशल मीडिया हाताळणारी टीम तयार करण्यात आली असून, ही टीम सोशल मीडियावर रील्स अपलोड करण्यापासून ते संकेतस्थळावर पोस्ट अपडेट करण्यापर्यंतचे काम करणार आहे. गझल कट्टा, कवी कट्टा, प्रकाशन कट्ट्याचे अपडेट्स तर मिळतीलच. त्याशिवाय परिसंवाद, मुलाखती, कथाकथन, बालमेळावा, सांस्कृतिक कार्यक्रमांची छायाचित्रे, व्हिडीओही सोशल मीडियावर अपलोड केले जाणार आहेत. संमेलन हायटेक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
याविषयी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि संमेलन संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, यू-ट्यूबसह फेसबुकवर साहित्य संमेलनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. संमेलनाचा उद्घाटनाचा आणि समारोपाचा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे जगभरातील साहित्यप्रेमींपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या साहित्यप्रेमींना काही कारणास्तव संमेलनाला येता आले नाही, त्यांना घरी बसून संमेलनाचा आनंद घेता यावा हा आमचा प्रयत्न आहे.
लाइव्ह अपडेटसह छायाचित्रे अन् व्हिडीओ
साहित्य संमेलनाच्या प्रत्येक अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनावर आधारित संकेतस्थळही तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे अनावरण येत्या आठवड्याभरात होणार असून, प्रत्येक कार्यक्रमांच्या लाइव्ह अपडेटसह छायाचित्रे आणि व्हिडीओ संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहेत.