

येरवडा: येरवडा येथील पुणे महापालिका संचालित स्व. राजीव गांधी रुग्णालयात श्वानदंश झालेल्या रुग्णाला अँटिरेबीज लस देण्यास नकार देण्यात आला. संबंधित रुग्णालयात अँटिरेबीज लस असतानाही देण्यास नकार देण्यात आल्याने अखेर स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांना हस्तक्षेप केल्यानंतर ही लस देण्यात आली. मात्र, असे प्रकार अनेकदा घडले असून, त्याबाबत संबंधित आरोग्यसेवा देणारा कर्मचारीवर्ग आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
लोहगाव येथील निंबाळकरनगर परिसरात राहणाऱ्या एका कॉलेजवयीन विद्यार्थिनीला परिसरातील एका कुत्र्याने चावा घेतला. त्यानंतर त्या विद्यार्थिनीने त्वरित स्व. राजीव गांधी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अँटिरेबीज इंजेक्शन देण्यास नकार देण्यात आला. अनेक विनवनीनंतर संबंधित विद्यार्थिनीला इंजेक्शन देण्यात आले. मात्र, उर्वरित इंजेक्शनचा डोस बर्मासेल येथील आरोग्य केंद्रातून घ्यावे, असे सांगण्यात आले. दुसरे इंजेक्शन विद्यार्थिनीने बर्मासेल रुग्णालयातून घेण्यात आले.
मात्र, राहत्या ठिकाणांपासून हे रुग्णालय दूर असल्याने शनिवारी (दि. 6) येरवड्यातील पालिका रुग्णालयात येऊन अँटिरेबीजचा तिसरा डोस देण्याची विनंती विद्यार्थिनीने केली. मात्र, शनिवारी सकाळी पुन्हा तिसरे इंजेक्शन घेण्यासाठी आले असता कर्मचाऱ्यांनी इंजेक्शन देण्यास नकार दिला. या वेळी परिसरातील माजी नगरसेविकेला दूरध्वनी केल्यावर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. रुग्णालयात अशा प्रकारे रुग्णास उपचार देण्यास नकार देणे वा टाळाटाळ करण्याचे प्रकार संबंध डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून होत असून, लोकांच्या कररूपी पैशातून वेतन उचलणाऱ्या या कर्मचाऱ्यांना उपचार नाकारण्याचा अधिकार आहे काय? असा सवाल करीत संबंधित कर्मचाऱ्यांवर व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
रुग्णालयात येणाऱ्या परिसरातील सर्व नागरिकांवर उपचार केले जातात. त्यासाठी औषधाचा पुरेसा साठासुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांवर उपचार नाकारले जातात, हे खरे नाही, तरी त्याबाबतची सत्यता पडताळून पाहू.
डॉ. मनीषा जाधव, निवासी अधिकारी, स्व. राजीव गांधी रुग्णालय
स्व. राजीव गांधी रुग्णालयात सोमवारी त्याबाबतचा फलक लावण्यात येणार आहे. रुग्णांना उपचार नाकारले जात असतील, तर रुग्णांनी त्या फलकावर दिलेल्या संपर्क क्रमांकावर आम्हाला कॉल करावे. आम्ही जरूर त्याची दखल घेऊ.
डॉ. ज्ञानेश्वर चकोर, वैद्यकीय अधिकारी, येरवडा क्षेत्रीय कार्यालय
स्व. राजीव गांधी रुग्णालयात नेहमी रुग्ण नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ओळखीच्या रुग्णांना मदत करता येते, पण इतर गरजू रुग्णांना उपचार नाकारणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी आणि डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत.
अश्विनी लांडगे, माजी नगरसेविका