सोशल मीडियावर अश्लील रिल्सचा मारा | पुढारी

सोशल मीडियावर अश्लील रिल्सचा मारा

संतोष शिंदे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: लाईक आणि सबस्क्राईबर वाढवण्याच्या स्पर्धेत सोशल मीडियावर शिव्यांसह अश्लील कंटेन्ट असलेल्या व्हिडीओचा मारा सुरू आहे. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढू लागले आहे. पालकांचे लक्ष नसताना लहान मुलेदेखील ‘रिल्स’ मोठ्या आवडीने पाहत आहेत. या व्हिडिओमुळे लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वर्षभरापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव येथील एका तरुणीने इन्स्टाग्रामवर अश्लील भाषेत शिवीगाळ करीत व्हिडीओ तयार केला होता. यामध्ये काही ठिकाणी तर थेट 302 म्हणजेच खून करण्याची धमकी दिली होती. यासह अनेक व्हिडीओमध्ये संबंधित तरुणी आणि तिच्या मित्रांनी अश्लील कंटेन्ट वापरला होता.

सोशल मीडियावर तरुणीचे व्हडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर थेरगावच्या स्थानिक नागरिकांनी बदनामी होत असल्याचा आरोप करीत तिच्यावर कारवाईची मागणी केली. याची गंभीर दाखल घेत तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तथाकथित थेरगाव ‘क्वीन’सह तिघांवर गुन्हा दाखल करीत त्यांना बेड्या ठोकल्या. तसेच, त्यांच्याकडून माफीनामा घेत त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते.  या कारवाईनंतर अशा प्रकारचे रिल्स करणार्‍यांवर अंकुश लागेल, अशी अपेक्षा होती; मात्र अलीकडे तथाकथित थेरगाव क्वीनसारख्याच अनेकांनी अश्लील भाषेत संवाद साधत रिल्स बनवण्यास सुरुवात केली आहे. या रिल्सला काही आंबटशौकीन मंडळी उघडपणे लाईक ठोकू लागले आहेत. परिणामी संबंधित यूजरला मिलियन्समध्ये व्हिव्ह, लाईक्स असल्याचे पाहावयास मिळत आहे. या वाढत्या प्रतिसादामुळे सोशल मीडियावरील खोडसाळांचे चांगलेच फावले आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

प्रोग्रामिंगमुळे रिल्सची पुनरावृत्ती

अनेकदा अश्लील कंटेन्ट असलेला व्हिडीओ किंवा रिल्स चुकून ओपन होते. त्यावर आपण किती वेळ टिकून राहिलात, याच्या माहितीचे प्रोग्रामिंगद्वारे जतन केले जाते. त्यानंतर आपली रुची अशा प्रकारच्या व्हिडिओंमध्ये असल्याचे गृहीत धरून पुन्हा तसेच व्हिडीओ समोर येऊ लागतात. गुगलसह, फेसबुकसारख्या अशा प्रकारच्या प्रोग्रामिंगचा वापर करतात. लहान मुलांकडून अशा प्रकरच्या चुका जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या मोबाईलमध्ये डोकावणे गरजेचे आहे.

भाईगिरीची क्रेज

सध्या सोशल मीडियावर भाईगिरी करण्याची क्रेज दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दरम्यानच्या काळात विशेष मोहीम राबवून रिल्सवरील भाईगिरी मोडून काढली होती. मात्र, राज्याच्या वेगवेगळ्या भागातून तरुण अशा प्रकारचे रिल्स तयार करत आहेत. या सर्वांवर गुन्हे दाखल करणे शक्य नसल्याने यापुढे पोलिस यंत्रणा रिल्सवरील भुरट्या भाईंचा बंदोबस्त कसा करणार, हा मोठा प्रश्न आहे.

स्वतंत्र यंत्रणा हवी

एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डकडून तपासणी केली जाते. आक्षेपार्ह वाटणार्‍या सीन्सवर कात्री लावली जाते. मात्र, सोशल मीडियावर प्रसिद्ध होणार्‍या चित्रफितींकडे कोणाचेही लक्ष किंवा अंकुश नाही. प्रत्यक्षात चित्रपटगृहात जाणार्‍या प्रेक्षकांच्या तुलनेत सोशल मीडियावर चित्रफीत पाहणार्‍यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील प्रसिद्ध होणार्‍या कन्टेन्टवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असण्याची गरज निर्माण झाली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार

आजच्या तरुण पिढीला सोशल मीडियावर पोस्ट करणे हे आपल्याला मिळालेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाटते. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे दुसर्‍यावर चिखलफेक करणे नसून ते विचारांचे आणि अनुभूतीचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्याच्या मूलभूत अधिकाराचे पणन होत असेल किंवा सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्यास तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता, याची दखल तरुणांनी घेतली पाहिजे.

पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल दिल्यानंतर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. मुलगा अभ्यासाव्यतिरिक्त आणखी काही पाहत नाही ना, याची वेळोवेळी खात्री करावी. तसेच, ब्राउजिंगमधील कॅशे आणि हिस्टरी वेळोवेळी डिलिट करावी. एखाद्या अ‍ॅपमध्ये अश्लील नोटिफिकेशन येत असल्यास अ‍ॅप अपडेट करावे. तसेच वारंवार आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणार्‍या ‘युजर्स आयडी’ला रिपोर्ट करावे.

               – सतीश माने, सहायक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी-चिंचवड

हेही वाचा

Back to top button