डाॅ. अविनाश भोंडवे : कोरोनाच्या बुस्टर डोसची आवश्यकता आहे का? | पुढारी

डाॅ. अविनाश भोंडवे : कोरोनाच्या बुस्टर डोसची आवश्यकता आहे का?

पुढारी ऑनलाईन डेस्क

आरोग्यमंत्र्यांना नुकतीच कोरोनाचा तिसरा डोस घ्यावा लागेल, असं सांगितलं. त्यानंतर सर्व क्षेत्रांत तिसरा डोस (बुस्टर डोस) घ्यायचा का, यावर चर्चा होऊ लागली. त्यानंतर पुढारी ऑनलाईनच्या प्रतिनिधी भाग्यश्री जाधव यांनी आयएमए, महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डाॅ. अविनाश भोंडवे यांच्याशी संवाद साधला. तिसऱ्या डोससंबंधी त्यांनी सांगितलेलं विश्लेषण पुढीलप्रमाणे…

पहिला डोस घेतल्यानंतर साधारणपणे १४ व्या दिवशी आपल्या शरीरात अँटी बाॅडीज तयार व्हायला लागतात. त्या दुसऱ्या डोसपर्यंत ५०-५५ टक्क्यांपर्यंत अँटी बाॅडीज वाढतात. दुसऱ्या डोसमध्ये ८०-८५ टक्क्यांपर्यंत अँटी बाॅडीज वाढतात. पण, नंतर संशोधनात आढळून आलं की, साधारणपणे ६-८ महिन्यांनतर आपल्या शरीरातील अँटी बाॅडीज कमी व्हायला लागतात. त्यामुळे जगभरात अर्थात अमेरिका, ब्रिटन, इस्त्राईलमध्ये तिसरा डोस द्यायला सुरुवात झाली. त्यामुळे भारतातही तिसरा डोस द्यावा लागेल. फ्रंडलाईन वर्कर्सच्या शरीरातील अँटी बाॅडीज कमी झालेल्या असतील, त्यामुळे त्यांना तिसरा नक्कीच द्यावा लागेल.

डाॅ. अविनाश भोंडवे सांगतात की, अनेक संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी असं सांगितलं आहे की, फ्रंटलाईन वर्कर अर्थात डाॅक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि जे कोरोनाने दगावण्याची शक्यता आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांनाही तिसरा डोस द्यावा, असं सांगितलेलं आहे. या केंद्र सरकार आणि आयसीएमआरएदेखील सकारात्मक आहे. याची दुसरी बाजू अशी की, जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील असं सांगितलेलं आहे की, संपूर्ण जगाचं लसीकरण झालं पाहिजे. तरच जगातून कोरोना नष्ट होणार आहे. पण, जगातील आफ्रिका, दक्षिण अमेरिका, यांसारख्या गरीब देशांमध्ये अजून लसीकरण केवळ १ ते २ टक्केच झालं आहे आणि दुसरीकडे श्रीमंत देशांमध्ये तिसरा डोस घेतला जात आहे, त्यामुळे तिसरा डोस देऊ नये, असं मत डब्ल्युएचओनं मांडलेलं आहे.

भारत सरकारच्या आरोग्य खात्यात असाही एक मतप्रवाह आहे की, भारतात आतापर्यंत १०२ कोटी लोकांना लस दिलेली आहे. पण, अजून १६० कोटी लोकांना डोस अजून आपल्याला द्यायचेच आहेत. म्हणजेच १५८ कोटी लोकांना दुसरा डोस द्यायचा आहे. हे पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या डोसचा विचार करायला हवा. अजून आपल्या लहान मुलांचंही लसीकरण व्हायचं आहे. हा सगळा ताण विचारात घेतला तर असा लक्षात येतं की, भारतात तिसरा डोस द्यायला उशीर होईल. पण, तिसरा डोस आपल्याला घ्यावा लागणारच. कारण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहे.

येत्या २-४ महिन्यांना आणखी एक विषाणू येण्याची शक्यता आहे, जो सर्वांना बाधित करण्याची शक्यता आहे. कदाचित लसीचाही त्याच्यावर परिणाम होणार नाही. यामुळे तिसऱ्या लाटेला लढा देण्यासाठी जे फ्रंटलाईन वर्कर्स, डाॅक्टर आणि नर्सेस आहेत त्यांना पहिल्यांदा तिसरा डोस देणं अत्यंत आवश्यक आहे. एकूणात शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर तिसरा डोस द्यावाच लागेल. साधारण दुसऱ्या डोसनंतर ८ महिन्यांनंतर तिसरा डोस द्यावा. एकंदरीत पाहिलं तर साधारण दरवर्षा असे फ्लू सारखे आजार येतात. त्यामुळे भारतात पुढची काही वर्षं तरी आपल्याला दरवर्षी असे डोस घेण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असंही डाॅ. अशोक भोंडवे यांनी सांगितलं.

हे वाचा…

Back to top button