Corona : दोन कंपन्यांची कोरोनावरील गोळी लवकरच बाजारात! | पुढारी

Corona : दोन कंपन्यांची कोरोनावरील गोळी लवकरच बाजारात!

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : जगातील आर्थिकद़ृष्ट्या कमकुवत आणि साधारण देशांतील नागरिकांचा (Corona) कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन बहुराष्ट्रीय औषध कंपन्या मैदानात उतरल्या आहेत. या कंपन्यांनी आपल्या संशोधनातून विकसित केलेल्या कोरोनावरील विषाणूविरोधी औषधाच्या निर्मितीचे विनामोबदला हक्क देण्याचे धोरण स्वीकारले असून जागतिक बाजारामध्ये महिनाभरात हे औषध दाखल होईल, असे चित्र आहे.

अमेरिकास्थित ‘फायझर’ आणि फ्रान्समधील ‘मर्क’ या दोन बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांनी याविषयीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ‘मोलन्यूपिरावीर’ या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या काही महिन्यांपूर्वी सुरू केल्या होत्या. त्याच्या अंतिम चाचण्यांचे अहवाल सादर केल्यानंतर त्यांना या विषाणूविरोधी औषधाच्या उत्पादनाची अनुमती देण्यात आली.

यानंतर या कंपन्यांनी हे औषध जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचण्यासाठी जेनेरिक औषधांची निर्मिती करणार्‍या कंपन्यांना विनामोबदला (पेटंट चार्जेस) या औषधाची निर्मिती करण्याचे हक्क देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यानुसार जगातील आर्थिकद़ृष्ट्या अडचणीत असलेल्या 95 देशांमध्ये हे औषध पोहोचविण्याचे नियोजन आहे. (Corona)

कोरोनावरील या विषाणूविरोधी औषधाच्या निर्मितीसाठी परवाना मिळविण्याकरिता जगभरातील जेनेरिक औषधांच्या निर्मितीमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य समूहाच्या मेडिसिन पेटंट पूल या संस्थेबरोबर करार करावा लागणार आहे. ही संस्था संयुक्त राष्ट्र संघटनेशी संबंधित आहे. या संस्थेमार्फत त्यांना निर्मितीचा परवाना दिला जाईल.

या गोळीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचा धोका टळतो; शिवाय रुग्णालयात जाण्यापासूनही 89 टक्के नागरिकांना संरक्षण मिळते, असा निष्कर्ष आहे. त्यांनी ‘पॅक्स्लोव्हिड’ या नावाने आपले औषध बाजारात आणले आहे. हे औषध एचआयव्ही रुग्णांच्या उपचारामध्ये वापरण्यात येणार्‍या ‘रिटोनॅवीर’ या औषधासोबत दिले जाते. हे औषध बाजारात यापूर्वीपासूनच उपलब्ध आहे.

* जगाच्या नकाशावरील 95 देश हे आर्थिकद़ृष्ट्या कमकुवत वा सर्वसाधारण गटातील आहेत. या देशांची एकत्रित लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 53 टक्के इतकी आहे. तेथे रोगावरील उपचाराचा खर्च नागरिकांच्या आवाक्याबाहेरचा असल्याने ही गोळी त्यांचा कोरोनापासून बचाव करू शकते, असे निरीक्षण आहे. भारतात डॉ. रेड्डीज लॅब या कंपनीने ‘मर्क’ या कंपनीबरोबर यापूर्वीच करार केला असून त्याची निर्मिती प्रगतिपथावर आहे.

Back to top button