Pune News : राष्ट्रपतींच्या दौर्‍यामुळे शहरातील वाहतुकीत बदल | पुढारी

Pune News : राष्ट्रपतींच्या दौर्‍यामुळे शहरातील वाहतुकीत बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या तीन दिवसीय पुणे दौर्‍यावर आहेत. त्यांचा दौरा सुरळीत पार पडावा यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील वाहतूक मार्गात पुढील तीन दिवस तात्पुरत्या स्वरूपाचा बदल करण्यात आला आहे. या वेळी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. गुरुवारी (दि.30) ते शुक्रवार (दि.1) असा तीन दिवस बदल असणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु पुणे मुक्कामी असणार आहेत. उद्या, गुरुवारी (दि. 30) दुपारी 1 ते 4 आणि शुक्रवारी (दि.1) सकाळी 9 ते 12 या वेळेत शहरातून विमानतळाकडे जाणार्‍या व येणार्‍या वाहनचालकांनी पुणे-नगर रस्त्यावरील रामवाडी ते एअरपोर्ट रोडचा वापर करावा. या दोन्ही दिवशी संपूर्ण दिवसभर कालावधीत लोहगाव ते विमानतळ आणि विमानतळ ते विश्रांतवाडी दरम्यानच्या मार्गावर दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या माल वाहतूक वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.

शुक्रवारी सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैरोबानाला ते स्वारगेट येथील जेधे चौक व भैरोबानाला ते पुणे स्टेशन या दोन्ही रस्त्यावर सर्व प्रकारच्या माल वाहतूक करणार्‍या वाहनांसाठी प्रवेश बंदी असेल. गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते पाषाण रस्त्यावरील रायगड बंगला हा एकेरी मार्ग दुपारी 3 ते 4 दरम्यान व्ही.व्ही.आय.पी.साठी दुहेरी करण्यात येत असल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

हेही वाचा

आरोपीच्या पत्नीला मारहाण प्रकरण; एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा

योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन

Cop28 dubai : हवामान बदलासंदर्भात आजपासून दुबईत COP-28 परिषद

Back to top button