Pimpri News : ‘दिवाळीनंतर टाकणार नवीन ड्रेनेजलाईन’ | पुढारी

Pimpri News : ‘दिवाळीनंतर टाकणार नवीन ड्रेनेजलाईन’

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : दापोडी येथील जयभीमनगर, हिवाळे वस्ती, जाधव चाळ, श्रावस्ती कॉलनी भागात ड्रेनेजलाईन वारंवार तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत दिवाळीनंतर नवीन ड्रेनेजलाईन टाकण्यात येणार असल्याचे पालिका अभियंत्यांनी कळवले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचे ड्रेनेज तुंबण्याच्या समस्येपासून लवकरच सुटका होणार आहे.

दापोडीतील अरुंद गल्ल्यांमधील रस्त्यात तुंबलेल्या गटाराचे घाण पाणी एक दिवसाआड घरात घुसण्याचा प्रकाराने येथील स्थानिक नागरिक आधीपासून हैराण झाले आहेत. त्यामुळे रोगराईची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपाची गटाराची साफसफाई नियमित केली जावी, तसेच पालिकेने पाईपलाईन टाकण्याचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मागील दीड महिन्यापूर्वी जनसंवाद सभेत हा प्रश्न स्थानिकांकडून मांडण्यात आला होता; परंतु कोणतीही ठोस उपाययोजना का केली जात नाही? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. येथील ड्रेनेजलाईनविषयी पुढारीने वारंवार वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची आता दखल घेण्यात आली आहे. दिवाळीनंतर नवीन ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

सणासुदीच्या काळामध्ये ड्रेनेज ओव्हर फ्लो झालेले आहे. हिवाळे चाळ, श्रावस्ती कॉलनीची पाहणी अधिकार्‍यांनी केली, परंतु काम लवकरात लवकर सुरू करावे. गटाराच्या पाण्यातच पिण्याचे पाणी स्थानिकांकडून भरले जाते. याला कोण जबाबदार आहे? असा सवाल स्थानिक रहिवाशी रवी कांबळे यांनी केला आहे.

दापोडी जयभीमनगर भागातील हिवाळे वस्ती, जाधव चाळ, श्रावस्ती कॉलनी भागात पाहणी करण्यात आली आहे. चेंबरचे मोजमाप करण्यात आले आहे. दिवाळीनंतर नवीन ड्रेनेजलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल.

-विजय जाधव, उप अभियंता मलनिःसार

हेही वाचा

Back to top button