Ajit Pawar : पुण्याचे पालकमंत्री अजितदादाच ! भाजप कार्यकर्त्यांची कोंडी | पुढारी

Ajit Pawar : पुण्याचे पालकमंत्री अजितदादाच ! भाजप कार्यकर्त्यांची कोंडी

Dnyaneshwar Bijale

पुणे : पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात निर्माण झालेला वाद सुटला असून, पुण्याच्या पालकमंत्री पदाची माळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळ्यात पडली. पुण्याचे विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती या जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

पुण्याचे पालकमंत्री पद सोडण्यास भाजप तयार नव्हते. तर, पवार यांनी तो मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. त्यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी नमते घेत पवारांकडे पुणे जिल्ह्याची सुत्रे सोपविली. त्याचा अप्रत्यक्ष फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे, तर पुणे शहरात भाजपची पक्ष म्हणून थोडी पिछेहाट होण्याची शक्यता आहे. सध्या महापालिकेत प्रशासक असल्यामुळे, तेथे पालकमंत्री यांचेच आदेश चालतील. त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी होणार आहे. त्यामुळे भाजपला पुढील काही काळ शहरात माघार घ्यावी लागणार असल्याचे दिसून येते.

पालकमंत्री असताना पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीत घेतलेल्या निर्णयाला पवार यांनी तोंडी स्थगिती दिली होती. त्याबाबत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तरीही तो तिढा सुटला नव्हता. आता तर सर्व सुत्रे पवार यांच्याच हाती गेली आहेत.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पवार यांच्या पाठिराख्या आमदारांचेच वर्चस्व असून, त्यांच्या दृष्टीने पालकमंत्री पदाचा निर्णय फायदेशीर ठरणारा आहे. दुसऱया बाजूला ग्रामीण भागातील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांची कोंडी होणार आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार यांना न दुखावण्याचा निर्णय भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे जाणवते. मात्र, त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांची व कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा

गोव्याच्या विकासात श्रीपाद नाईक यांचा सिंहाचा वाटा : मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

बीडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे

गोव्याच्या विकासात श्रीपाद नाईक यांचा सिंहाचा वाटा : मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

Back to top button