पुणे; पुढारी वृत्तसेवा : ताशी किमान 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे, जोरदार मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पुढील तीन दिवस राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणेसह कोकणातील सिंधुदुर्ग, विदर्भातील सर्वच जिल्हे आणि मराठवाड्यात 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या बहुतांश भागांत हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
संबंधित बातम्या :
राजस्थानच्या पश्चिम भागातून 25 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला; तर मंगळवारी पश्चिम भारतातील बहुतांश भागांतून मान्सूनने परतीच्या प्रवासास सुरुवात केली आहे. असे असले तरी राज्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे कमाल तापमानात सरासरी 30 ते 32 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली होती.
मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून विदर्भातील नागपूरसह आसपासच्या जिल्ह्यांना अतिवृष्टीने धुमाकूळ घातला. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेच; शिवाय शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यानंतर पाऊस थोडासा कमी झाला आहे, असे वाटत असतानाच मंगळवारपासून मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात पावसाने पुन्हा जोरदार मुसळधार बरसण्यास सुरुवात केली आहे; तर मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना पावसाने जोरदार तडाखा दिला असल्याची बाब पुढे आली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भापासून दक्षिण कोकणपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, त्याचा जोर वाढलेला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यास पूरक असलेल्या स्थितीमुळे राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार आहे. या स्थितीबरोबरच तेलंगणा या भागावर चक्रीय स्थिती कार्यरत आहे.
मध्य पूर्व बंगालच्या उपसागरापासून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत आणखी एक चक्रीय स्थिती कार्यरत आहे. याशिवाय उत्तर अंदमानच्या समुद्रावर असलेल्या चक्रीय स्थितीचे रूपांतर 29 सप्टेंबर रोजी कमी दाबाच्या पट्ट्यात होणार असून, हा पट्टा उत्तर अंदमान समुद्रापासून ते मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात 24 तास कार्यरत राहणार आहे. त्यानंतर हा पट्टा पश्चिम उत्तर भागाकडे सरकणार आहे. या सर्व स्थितीचा परिणाम राज्यातील पावसावर झाला असल्यामुळे राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस बरसणार आहे.
पुणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, यवतमाळ, वाशिम, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे.
हेही वाचा