Mumbai News : कांदा प्रश्न आता दिल्ली दरबारी; शुक्रवारी बैठक | पुढारी

Mumbai News : कांदा प्रश्न आता दिल्ली दरबारी; शुक्रवारी बैठक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ यांनी थेट शेतकर्‍यांकडून कांदा खरेदी करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी दिल्ली येथे 29 सप्टेंबर रोजी बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
कांदा उत्पादक शेतकरी, व्यापार्‍यांसह ग्राहकवर्गाच्याही हिताचे रक्षण करण्याचा राज्य शासनाचा सर्वतोपरी प्रयत्न आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापार्‍यांनी लिलावबंदीचा निर्णय मागे घेऊन तातडीने कांदा खरेदी सुरू करावी, असे आवाहन गोयल व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

सकाळी मंत्रालयात कांदा व्यापार्‍यांसोबत आयोजित बैठकीतूनच उपमुख्यमंत्री पवार यांनी केंद्रीय मंत्री गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून याप्रश्नी तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा केली होती. उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत, संध्याकाळीच कांदा व्यापार्‍यांसोबत बैठक घेऊन याप्रश्नी तत्काळ तोडगा काढण्याची तयारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दाखवली. त्यानुसार ही बैठक झाली. दरम्यान, कांदा सडत असल्याने व्यापार्‍यांनी हा संप लवकरात लवकर संपवावा, असा सज्जड दम पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी भरला आहे.

Back to top button