kolhapur Rain : जाता जाता जोरदार बरसला | पुढारी

kolhapur Rain : जाता जाता जोरदार बरसला

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरासह कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागाला मंगळवारी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास आजच सुरू झाला आणि दुपारी साडेचार वाजता सुरू झालेला हा पाऊस अवघ्या तासाभरातच सुमारे 27 मि.मी.पेक्षा जादा बरसला. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शहरासह जिल्ह्यातील गणेश मंडळे आणि त्यासमोरील व्यावसायिकांची तारांबळ उडाली. रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. दुपारी साडेचार वाजता सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता, यामुळे कोल्हापुरातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसाने गणेशोत्सवाच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. (kolhapur Rain)

दुपारी साडेचारच्या सुमारास वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. काही वेळात पावसाचा जोर वाढला. पावणेपाच ते सव्वापाच अशा अर्ध्या तासात तर चारी दिशांनी बेधुंद पाऊस कोसळत राहिला. पावसाचा जोर इतका होता की, अवघ्या पाचच मिनिटांत गटारी रस्त्यांवरून वाहू लागल्या. रस्त्यांवरून वाहणारे पाण्याचे लोट, त्यासोबत येणारे दगड-गोटे, कचरा, यामुळे अनके लहान रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले.

व्यापारी पेठा, भाजीमंडईंत दाणादाण पावसाने बाजारपेठ, व्यापारी पेठ, भाजी मंडईंत दाणादाण उडाली. जोरदार पावसाने विक्रीसाठी ठेवलेले साहित्य सुरक्षितस्थळी हलवताना दमछाक झाली. काही व्यापारी, विक्रेत्यांचे नुकसानही झाले. भाजी मंडईंत तर विक्रेत्यांचे मोठे हाल झाले. पावसाने काही ठिकाणी भाजीही वाहून गेली. ग्राहकांनीही पाठ फिरवल्याने रात्री उशिरापर्यंत मंडईंत फारशी गर्दी नव्हती, त्याचा विक्रेत्यांना फटका बसला. गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठा, व्यापारी पेठांत केलेल्या आकर्षक सजावटीचे पावसाने चांगलेच नुकसान झाले. खाद्यपदार्थ, विविध वस्तूंच्या विक्रीच्या स्टॉलधारकांना पावसाचा फटका बसला.

दुपारी साडेचारच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाचा जोर साडेपाचनंतर काहीसा कमी झाला. मात्र, पाऊस पूर्णपणे थांबत नव्हता. याउलट त्याचा अधूनमधून जोर वाढत होता. यामुळे शासकीय कार्यालयांत कर्मचारी, नागरिक अडकून पडले. शाळांतही अनेक विद्यार्थी काही काळ थांबून राहिले. शहरातील रस्त्यांवरील वर्दळ पावसाने पूर्णतः कमी झाली होती. जागा मिळेल तिथे लोक पावसापासून आडोसा करून थांबले होते. केएमटी बसेससह रिक्षांनाही गर्दी होती. पावसाचा जोर इतका होता की, अनेकांनी दुचाकी आहे त्या ठिकाणी ठेवून रिक्षा, बस आदींद्वारे घरी जाणे पसंद केले. पर्यटक, भाविकांचीही तसेच बाहेर गावाहून देखावे पाहण्यासाठी दुपारपासूनच कोल्हापुरात आलेल्यांचीही पावसाने धांदल उडाली.

पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. सीपीआर चौकात साचलेल्या पाण्यातून मार्ग काढणेही कठीण झाल्याने पोलिसांना बॅरिकेडिंग लावावे लागले. भाऊसिंगजी रोडवर जयंती नाला पुलावर पाणी साचले, त्यातूनच वाहनधारकांना मार्ग काढावा लागत होता. परीख पुलाखालीही काही काळ पाणी साचले, त्यातून ये-जा करताना वाहनधारकांसह पादचार्‍यांचे हाल झाले. या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, कोषागार कार्यालय परिसर, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शिवाजी स्टेडियम आदी परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर शहराच्या प्रमुख मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली. काही ठिकाणी सिग्नल बंद ठेवून वाहतूक सुरळीत करण्यात येत होती. पावसाने जयंती नाला रात्रीनंतर दुथडी भरून वाहू लागला आहे. (kolhapur Rain)

पावसाने शहरात काही ठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या कोसळल्या. ताराराणी चौक, शासकीय विश्रामगृह, रूईकर कॉलनी, जयंती नाला परिसरात झाडे पडली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली. पावसाने काही घरांच्या तसेच दुकानांच्या बेसमेंटमध्येही रस्त्यावरून वाहून जाणारे पाणी शिरल्याने तारांबळ उडाली. शहराच्या उपनगरांतही पावसाने जनजीवनावर परिणाम झाला.

शहरासह जिल्ह्यात शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतही परतीचा जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर शहरात दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेपाच या वेळेत सुमारे 27 मि.मी. पावसाची नोंद झाली. यानंतरही पाऊस सुरू होता. गुरुवारपर्यंत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने सांगितले.

Back to top button