Pune Rain News : वरुणराजाची मनसोक्त बॅटिंग; पुण्यात 24 तासांत 25 मिलिमीटर पावसाची नोंद | पुढारी

Pune Rain News : वरुणराजाची मनसोक्त बॅटिंग; पुण्यात 24 तासांत 25 मिलिमीटर पावसाची नोंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गौरी आगमनाबरोबर पावसानेही दमदार हजेरी लावल्याने शहरात आनंदाचे उधाण आले आहे. संततधार पावसातही पुणेकरांनी शनिवारी छत्री घेऊन देखावे पाहण्याचा आनंद लुटला. शहरातील सर्वच रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत छत्र्यांचीच गर्दी होती. संततधार पावसाने रस्ते जलमय झाल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी दूर करताना पोलिसांना धावपळ करावी लागली. 24 तासांत शहरात 25 मिमी पावसाची नोंद झाली.

शहरातील नेहमीच वर्दळ असलेल्या सिंहगड रस्ता, शिवाजी रस्ता, शनिवारवाडा, बाजीराव रस्ता, मंडई परिसर, स्वारगेट, पुणे स्टेशन, सोमवार, कसबा, बुधवार पेठेसह उपनगरांत पावसाने गेल्या 24 तासांत जोरदार हजेरी लावली. शहरात शनिवारी दुपारी 30 मिनिटांत 9.2 मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील सर्वच भागांत दुपारपासून वाहतूक
कोंडी झाली.

संबंधित बातम्या :

सिंहगड रस्त्याला पूर

शनिवारी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली, तर दुपारी 2 वाजता पावसाने जोर धरला. तो संध्याकाळपर्यंत कायम होता. दुपारी दोन ते अडीच या अर्ध्या तासात 9.2 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाचा जोर इतका होता, की सिंहगड रस्त्याला जणू पूर आला होता. नीलायम चौक, दांडेकर पूल ते हिंगणे या भागात पावसाचा जोर जास्त वाढल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने पावसामुळे पुणेकरांना दोन तासांपेक्षा जास्त काळ खोळंबावे लागले.

हंगामात 350 मिमी पार

शहरात शुक्रवारी दिवसभरात चांगला पाऊस झाला, तर शनिवारीही दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे शहराचा आकडा यंदाच्या हंगामात 350 मिमी पार गेला. शहराची सप्टेंबरअखेरची सरासरी 650 मिमी असून, अजून 200 मिमी पावसाची तूट आहे. 24 तासांत शहरात 25 मिलिमीटरची नोंद झाली.

बुधवारपर्यंत यलो अलर्ट

शहरात बुधवार 27 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर
राहणार असून, हवामान विभागाने संपूर्ण जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. शहराभोवती ढगांची घनता 97 टक्के इतकी असून, मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपि यांनी दिला.

लोहगाव, चिंचवडमध्ये सर्वाधिक पाऊस…

शहरात शुक्रवारी व शनिवारी पाऊस मनसोक्त बरसला. वार्‍याचा वेग जास्त नसल्याने झाडपडीच्या फार मोठ्या घटना घडल्या नाहीत. शहरात लोहगाव व पिंपरी-चिंचवड परिसरात 24 तासांत 36 मिमीची नोंद झाली.

हेही वाचा

देशात ‘या’ ठिकाणी बाप्पांची सर्वात उंच मूर्ती

ऑस्ट्रियात सापडले 2200 वर्षांपूर्वीच्या मुलाचे बूट

पुण्यातील सहा उपनिबंधक रडारवर! शिस्तभंग कारवाईचा सहकार आयुक्तांचा इशारा

Back to top button