Sangli News : सांगली, मिरज, तासगावला मुसळधार पाऊस

Sangli News : सांगली, मिरज, तासगावला मुसळधार पाऊस

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्याला मंगळवारी पुन्हा झोडपून काढले. सांगली, मिरज, तासगाव भागात तर मुसळधार कोसळला. पावसाने महिनाभर पाठ फिरवल्याने बळीराजा सुखावला म्हणण्याइतपत पाऊस मात्र झालेला नाही. दुष्काळाची गडद छाया नष्ट होण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात सततच्या दमदार पावसाची मोठी गरज आहे.

सांगलीत पाणीच पाणी

दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर दुपारी सांगलीत मुसळधार पाऊस झाला. सकाळपासून वातावरण ढगाळ होते. दुपारी जोरदार कोसळला. तासाभराच्या पावसाने सांगलीत पाणीच पाणी झाले. सांगली तुंबली. स्टेशन चौक, राजवाडा चौक, महापालिका परिसर, सिटी पोस्ट चौक, सिव्हिल हॉस्पिटल चौक, राम मंदिर कॉर्नर, शंभर फुटी रस्ता, वालचंद कॉलेज रस्ता, झुलेलाल चौक, मुख्य
बसस्थानक, मित्रमंडळ चौक, मार्केट यार्डपासूनचा सेवा रस्ता हे सारे भाग पाण्याखाली होते. उपनगरांमधूनही पाणी साचले. आठवडा बाजारात त्रेधा उडाली. गणेश मंडळांची तर दाणादाण उडालीच, अनेकांच्या महाप्रसादावरही पाणी पडले. जिल्हाधिकारी कार्यालयापासून मिरज या भागात जोरदार पाऊस झाला.

मिरज तालुक्यात हजेरी

मिरज : शहरास सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास एक तास पावसाने झोडपून काढले. पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झालेले. हरिपूर, माधवनगर, बुधगाव, कवलापूर, बिसूर, नांद्रे भागातही जोरदार पाऊस झाला. संपूर्ण मिरज तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

पलूस तालुक्यात जोरदार

पलूस : संपूर्ण पलूस तालुक्यात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने तीन तास हजेरी लावली. तालुक्यातील वीजपुरवठा बंद करावा लागला. द्राक्ष बागायतदारांना या पावसाचा जोरदार फटका बसला. पलूससह भिलवडी, अंकलखोप, नागठाणे, दुधोंडी, कुंडल, आमणापूर, धनगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला.

भिलवडी परिसरात पाऊस

भिलवडी : प्रदीर्घ विश्रांतीनंतर भिलवडीमध्ये दुपारी पावसास प्रारंभ झाला. यामुळे बाजारपेठेमधील सर्व व्यवहार ठप्प झाले. तासभर सुरू असलेल्या पावसामुळे नाले वाहू लागले. वातावरणामध्ये गारवा पसरल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त झाले.

तासगाव पूर्व भागात मुसळधार

तासगाव : तासगाव शहर आणि तालुक्याच्या पूर्व भागाला दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. सलग दोन ते अडीच तास पडलेल्या पावसामुळे पूर्व भागात ओढे-नाले वाहते झाले. मणेराजुरी गावासह सावळज, मांजर्डे, चिंचणी, येळावी, सावर्डे, वाघापूर, योगेवाडी, उपळावी, कौलगे, लोढे परिसरात जवळपास दीड ते दोन तास मुसळधार पाऊस झाला. सावळज आणि मंडलातील, अंजनी, गव्हाण, नागेवाडी, वडगाव, डोंगरसोनी, सिध्देवाडी, दहिवडी, जरंडी, वायफळे, बिरणवाडी गावांत मुसळधार पाऊस पडला. येरळाकाठावर निंबळक, चिखलगोठण, बोरगाव, लिंब, मांजर्डे, आळते, शिरगाव, विसापूर भागामध्ये चांगल्या पावसाने हजेरी लावली.

वाळवा तालुक्यात हलका पाऊस

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात सायंकाळी हलका पाऊस झाला. हा पाऊस खरीप पिकासाठी पोषक आहे. उघडीपीनंतर पावसाने सुरुवात केल्याने शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरण आहे.

बागणी परिसराला झोडपले.

बागणी : बागणीसह अवघ्या परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. वाळू लागलेला ऊस, होरपळू लागलेली पिके यांच्यासाठी हा पाऊस कमालीचा उपयुक्त ठरणार आहे.

देवराष्ट्रे परिसरात पाऊस

कडेगाव ः देवराष्ट्रे वगळता तालुक्यात पाऊस पडलेला नाही. देवराष्ट्रे परिसरात मात्र समाधानकारक पाऊस झाला. देवराष्ट्रेसह कुंभारगाव, मोहिते वडगाव, आसद परिसरात मेघगर्जनेसह चांगला पाऊस झाला.
आटपाडी ः तालुक्यात सोमवारी व मंगळवारी दोन दिवस चांगला पाऊस झाला. दिवसभर पाऊस पडत होता.
शिराळा ः तालुक्यात ढगाळ वातावरण होते, पावसाने मात्र पाठ फिरवली.
कोकरूड : कोकरूड परिसरात मंगळवारी सायंकाळी परतीच्या हलक्या पावसाने हजेरी लावली. चार दिवसांपूर्वी सायंकाळी हलका पाऊस झाला होता. माळरानातील भात, भुईमूग व ऊस पिकांना हा पाऊस पोषक ठरणार आहे.
खानापूर ः विटा, कार्वे, गार्डी आणि घानवड परिसरात पावसाने हजेरी लावली. मध्यम स्वरूपाचा पाऊस पंधरा मिनिटे पडला.
कवठेमहांकाळमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पावसाने हजेरी लावल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. तालुक्यातील सर्वच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शहरात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शहर व उपनगर परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. पावसाने सुमारे दीड तास हून अधिक हजेरी लावली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news