पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात शुक्रवारी (दि. 23) दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला. दरम्यान, पुढील पाच दिवस शहरात ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा 30 अंशांच्या पुढे गेला होता. त्यातच कोरड्या वातावरणामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या.
मात्र, गुरुवारपासून शहरातील वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण तयार होऊन हळूहळू पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर मात्र अचानक शहराच्या सर्वच भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते एक तास मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. खड्ड्यांत पाणी साठल्यामुळे वाहने चालविणे अवघड झाले होते. पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांत वाहतूक कोंडी झाली. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
परिसरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी जाणार्या नागरिकांची यामुळे निराशा झाली. बिबवेवाडी,अप्पर, मार्केट यार्ड परिसरात सायंकाळी साडेचारच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र दिसून आले.
हेही वाचा