व्हिएन्ना ः ऑस्ट्रियामध्ये मिठाच्या एका खोल खाणीत पुरातत्त्व संशोधकांना तब्बल 2200 वर्षांपूर्वीच्या लहान मुलाचे बूट सापडले आहे. त्यावरून असे दिसून आले आहे की या खाणीत हजारो वर्षांपूर्वी अगदी लहान मुलंही काम करीत होती. या मुलानेही खाणीत बरीच मेहनत केली असल्याचे दिसते. कदाचित त्याचे काम काढलेल्या दगडांना फावड्याने हटवण्याचे होते, असे संशोधकांनी म्हटले आहे.
पुरातत्त्व संशोधकांनी म्हटले आहे की त्या काळी मुलांना खाणीत काही वेगळी कामे सांगितली जात असावीत. कदाचित या मुलाला बहुमूल्य सामग्री खाणीतून जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत नेण्याचे काम दिलेले असू शकते. खाणीत काम करणार्या लोकांनी सोडलेला हा एकमेव प्राचीन सुगावा इतका जुना आहे की त्यामधून अनेक प्रकारची माहिती मिळवता येऊ शकेल. जर्मन माइनिंग म्युझियमने एक प्रेस रीलिज करून याबाबतची माहिती दिली आहे. ऑस्ट्रियाच्या डर्नबर्गमध्ये लोहयुगातील मिठाच्या खाणीत एक सुरंग खोदला जात असताना हे बूट सापडले. या बुटाच्या आकारावरून दिसते की हा मुलगा पाच ते सहा वर्षांचा असावा.