देशात ‘या’ ठिकाणी बाप्पांची सर्वात उंच मूर्ती | पुढारी

देशात ‘या’ ठिकाणी बाप्पांची सर्वात उंच मूर्ती

हैदराबाद ः सध्या देशभर गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. ठिकठिकाणी घरी, सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत. शिवाय देशातील अनेक गणेश मंदिरांमध्येही भक्तांची दर्शनासाठी गर्दी वाढली आहे. देशभरात गणपती बाप्पाची अनेक मंदिरे आहेत. अनेक वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीही देशभरात पाहायला मिळतात. मात्र, देशातील सर्वात उंच गणेशमूर्ती कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तेलंगणात नागरकुर्नुलजवळ अवंचा येथील थिम्माजीपेठ येथे बाप्पाची अशी सर्वात उंच मूर्ती आहे. ही मूर्ती तब्बल 7.62 मीटर उंचीची आहे. चबुतर्‍याची उंची यामध्ये समाविष्ट केली तर मूर्तीची एकूण उंची 9.144 मीटर इतकी होते.

बाराव्या शतकात पश्चिम चालुक्य साम—ाज्याच्या काळात या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. अतिशय भव्य असलेली ही मूर्ती ग्रॅनाईट शिळेत बनवण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातच ही मूर्ती आहे हे विशेष. या गणपतीचे नाव ‘ऐश्वर्य गणेश’ असे आहे. थिलापुडू नावाच्या राजाने ही मूर्ती बनवून तिची स्थापना केली. या राजाची राजधानी अवांचा येथे होती. या साम—ाज्याने तेलंगणामध्ये दोनशे वर्षे राज्य केले. देशातील सर्वात उंच मूर्तींमध्ये गुजरातच्या सिद्धिविनायक मंदिरातील मूर्तीचाही समावेश होतो. अहमदाबादजवळील मेहमदाबादमध्ये वात्रक नदीच्या काठी 2011 मध्ये हे मंदिर बांधण्यात आले. तेथील मूर्तीची लांबी 120 फूट, उंची 71 फूट आणि रुंदी 80 फूट आहे.

Back to top button