Anil Kadam : माजी आमदार अनिल कदम शरद पवार गटाच्या वाटेवर? दिल्लीत घेतली खासदार शरद पवार यांची भेट

Anil Kadam : माजी आमदार अनिल कदम शरद पवार गटाच्या वाटेवर? दिल्लीत घेतली खासदार शरद पवार यांची भेट
Published on
Updated on

निफाडमधील शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय पटलावर चर्चेला उधाण आले आहे. समाजमाध्यमांतून कदमांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर कदम राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

संबधित बातम्या :

राजकारणात बेरका समजल्या जाणाऱ्या व राजकीयदृष्ट्या सजग म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील विद्यमान आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार बनकर यांना धोबीपछाड देत कदम हे आमदारपदी विराजमान झाले होते. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बनकर यांना विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली. तद्नंतर २०१९ ला मात्र बनकर यांनी सर्वशक्तीनीशी मैदानात उतरत कदमांना चारीमुंड्या चित करत विजयाला गवसणी घातली. त्यानंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. अखेरच्या अंकात अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाला आणि अनिल कदमांसह त्यांच्या सर्मथकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सद्यस्थितीत निफाड मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे असून, महायुतीतील जागावाटपात निफाड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीमधील फाटाफुटीचे आजचे चित्र धूसर असले तरी पवार गट या मतदारसंघावर आपला दावा सांगण्याची अधिक शक्यता आहे. त्या दृष्टीने माजी आमदार कदम यांची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. याचच एक भाग म्हणून माजी कदम यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. निफाड मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असून, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या पिंपळगाव येथे झालेल्या सभेमुळे आमदार बनकरांचा विजय सुकर झाल्याचा दावा पवार गटाकडून केला जातो.

दिल्लीला खासगी कामासाठी गेलो होतो. पवार साहेबही दिल्लीत असल्याने त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सद्यस्थितीत कांदा आणि टोमॅटो यांच्या पडलेल्या बाजारभावाबाबत चर्चा केली. यावेळी साहेबांनीही याबाबत आस्थेने माहिती घेऊन मार्गदर्शन केले. ठाकरे परिवार आमचे दैवत आहे आणि शेवटपर्यंत राहणार. या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये.

माजी आमदार अनिल कदम

आणि कदम झाले अवाक् 

माजी आमदार अनिल कदम हे शरद पवार यांना भेटण्यासाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी गेले असता कदमांनी आपली ओळख शरद पवारांना सांगताच पवारांनी मध्यंतरी येवला येथे सभेस जाताना तुमच्या पत्नीशी भेट झाल्याचे कदमांना सांगितले. हे ऐकून क्षणभर कदम आवाकच झाले. साहेबांचे इतके वय होऊनही त्यांची स्मरणशक्ती इतकी दांडगी असल्याचा अनुभव आल्याचे कदम यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news