नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : बसपा खासदार दानीश अली यांच्याबाबत बोलताना भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी गुरुवारी लोकसभेत अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. चहूबाजूंनी टीका सुरू झाली असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधुडी यांना फटकारत इशारा दिला आहे. दुसरीकडे भाजपने त्यांना नोटीस बजावली असून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विधुडी यांच्या या वर्तनाबाबत माफी मागितली आहे.
गुरुवारी लोकसभेत चांद्रयान- ३ च्या यशस्वी प्रक्षेपणाबाबत आणि अंतराळ क्षेत्रात भारताच्या प्रगतीबाबत चर्चा सुरू असताना बिधुडी यांनी बसपाचे खासदार कुंवर दानीश अली यांच्याबाबत अत्यंत हीन भाषेत विधाने केली. यावरून सभागृहात जोरदार हंगामा झाला आणि विरोधकांनी बिधुडी यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही बिधुडी यांच्या विधानांची दखल घेत शुक्रवारी त्यांना भविष्यात जबाबदारीने न बोलल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. मात्र, विरोधकांनी भाजप खासदाराला निलंबित करण्याची मागणी केली.
बिधुडी यांच्या असभ्य भाषेसंदर्भात बसपाचे खासदार कुंवर दानीश अली यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले असून त्यात चौकशीसाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्याची मागणी केली आहे. नवीन संसद भवनात एका अल्पसंख्य आणि जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीबाबत असे विधान करणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे ते म्हणाले.
बिधुडी यांच्या या विधानाने चहूबाजूंनी टीका होत असताना भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निर्देशानंतर पक्षाने बिधुडी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षातही बिधुडी यांच्या या विधानावरून अत्यंत नाराजी असून पक्षातील नेतेही टीका करत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.