शिवनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ॲड.केशवराव सर्जेराव जगताप यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी तानाजी नमादेव देवकाते यांना संधी मिळाली. शनिवार (दि.२३) कारखाना संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी मावळते अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव, सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी उपस्थित होते.
माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष सागर जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्तपदी अध्यक्ष म्हणून ॲड.केशवराव जगताप यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी तानाजी देवकाते यांना संधी मिळाली आहे. बाळासाहेब तावरे यांनी राजीनामा दिल्यापासून मागील अनेक दिवस माळेगाव साखर कारखान्याचा नवीन कारभारी कोण? याबाबतची उत्सुकता आता संपली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप यांना सहकारातील दांडगा अभ्यास आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा आजही उल्लेख केला जातो. परिसरात एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तर उपाध्यक्षपदी संधी मिळालेले तानाजीराव देवकाते यांना देखील साखर कारखानदारीतील अनुभव असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे.
निवडी बाबत अध्यक्ष जगताप व उपाध्यक्ष देवकाते म्हणाले की, माळेगाव सहकारी साखर कारखाना राज्यात अग्रगण्य साखर कारखाना म्हणून ओळखला जातो,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाकालेला विश्वास सार्थ करणार असून मावळते अध्यक्ष बाळासाहेब तावरे व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, अधिकारी व कामगार यांना विश्वासात घेऊन माळेगाव साखर कारखान्याचा सहकारात असलेला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी काम पाहिले.
हेही वाचा