Pune Crime : आता पुण्यातही वाजणार छमछम? मद्यधुंद रात्रीला विदेशी ललनांची मैफल | पुढारी

Pune Crime : आता पुण्यातही वाजणार छमछम? मद्यधुंद रात्रीला विदेशी ललनांची मैफल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील काही हॉटेल, पब चालकांनी ’अरेबियन नाईट्स’ च्या नावे विदेशी तरुणींच्या नृत्याचे कार्यक्रम सुरू केले आहेत. नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर नृत्याचे हे कार्यक्रम मद्यधुंद रात्र जागवत पहाटेपर्यंत होत आहेत. विशेष म्हणजे समाजमाध्यमांवर अशा कार्यक्रमांची जाहिरात करून ऑफर्सची खैरात केली जात आहे. तरुण-तरुणींना आकर्षित करून रात्र जागवली जात आहे. त्यामुळे पुण्यातही आता डान्सबारची छमछम सुरू असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या :

दिवसेंदिवस पुण्यात नाईट कल्चर वाढीस लागले आहे. त्यातूनच पब संस्कृती फोफावते आहे. रात्री उशिरापर्यंत मद्याचा पेला रिचवत संगीताच्या तालावर बेधुंद होऊन झिंगाट तरुणाईचा मोठा वावर असतो. खातरजमा न करता, अल्पवयीन मुला-मुलींनासुद्धा येथे सहज प्रवेश दिला जातो. विविध ऑफर्स देऊन हॉटेल, पब व्यावसायिकांकडून तरुणाईला आकर्षित केले जाते. त्यासाठी काही ग्रुप काम करतात. त्यातूनच आता मद्याबरोबरच विदेशी तरुणींच्या नृत्याची मेजवानी देण्यास हॉटेल्स, पबवाल्यांनी सुरुवात केल्याचे समजते. विशेष म्हणजे विदेशातील तरुणींच्या नृत्याची मोठी जाहिरात करून ग्राहकांना हे हॉटेल व्यावसायिक आपल्याकडे खेचत आहेत, शिवाय यासाठी सुप्त स्पर्धादेखील आहे.

पोलिसांची पूर्वपरवानगी आणि व्हिसाच्या निर्धारित नियमानुसार विदेशी तरुणींच्या नृत्याचे कार्यक्रम हॉटेल, पबवाल्यांना आयोजित करता येत नसल्याचे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या तरुणी भारतात पर्यटन व्हिसावर येतात. त्यांना येथे आल्यानंतर कोणताही व्यवसाय करण्यास परवानगी नाही. मात्र, त्यांच्या नृत्याचे कार्यक्रम राजरोस जाहिरात करून पब, हॉटेलवाले आयोजित करतात. त्यातूनच हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय वाढल्याची चर्चा आहे.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईतून हे समोर आले आहे. स्पा, मसाज सेंटरमध्ये विदेशी तरुणींचा राबता आहे. त्यांच्याकडून मिळणार्‍या सेवेला येथे येणा-या ग्राहकांकडून मोठी पसंती आहे. स्पा, मसाजवाल्यांकडून नियमांना फाटा देत राजरोस अर्थकारणाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे हा प्रकार पोलिस, राज्य उत्पादन शुल्क आणि संबंधित इतर विभागांच्या निदर्शनास कसा येत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये नृत्य करताना विदेशी तरुणीने राष्ट्रध्वजाचा अवमान केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर याबाबत संबंधित तरुणीच्या विरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच दिवसांपूर्वी दक्षिण उपनगरातील एका हॉटेलमध्ये मोठी जाहिरात करत ’अरेबियन नाईट्स’ च्या नावे विदेशी तरुणींच्या नृत्याचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी देखील नियमांना तिलांजली देत स्थानिकांच्या वरदहस्तामुळे तेथे असे अनेक कार्यक्रम झाले आहेत. मात्र, या वेळी त्याची खबर पोलिसांना लागली. त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक पोलिसांच्या कृपाशिर्वादाने असे बेधुंद नृत्याचे कार्यक्रम होत असल्याची चर्चा आहे.

वेसण कोण घालणार?

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या अशा कार्यक्रमामुळे स्थानिक नागरिकांना कर्णकर्कश आवाजाबरोबरच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा, बंडगार्डन परिसरात तर पब, हॉटेलची मद्यधुंद पहाट संपल्यानंतर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येते. तसेच अनेकदा येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नियमांना बगल देत मद्यधुंद रात्र जागविणा-या हॉटेल, पबवाल्यांना वेसण कोण घालणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा

NCP News : बारामतीत गोपिचंद पडळकरांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीकडून जोडे

नाशिक : कासारवाडीत विहिरीत पडला, मोहदरी घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

नाशिक : कासारवाडीत विहिरीत पडला, मोहदरी घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Back to top button