पुणे; पुढारी वृत्तसेवा : श्रीगणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या पूजेसाठी पुरोहित बोलवायचे कुठून, हा प्रश्न सातासमुद्रापार राहणार्या मराठीभाषिकांना पडतो. त्यांची ही अडचण आता दूर झाली आहे… कारण पुण्यातील पुरोहित थेट परदेशात ऑनलाइन पद्धतीने पूजा सांगणार असून, यंदा विविध देशांमधून पुरोहितांकडे ऑनलाइन पद्धतीच्या पूजेसाठी विचारणा होत आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड, सिंगापूरसह दुबईत राहणार्या मराठीभाषकांच्या श्रीगणेशमूर्तींच्या प्रतिष्ठापनेची पूजा पुरोहित झूम अॅप, गुगल मीट, इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे करणार आहेत. याशिवाय गणेश याग, सत्यनारायण पूजाही पुरोहितांकडून ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून, विविध देशांमध्ये राहणार्या मराठी भाषकांकडून ऑनलाइन पद्धतीच्या पूजेसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
संबंधित बातम्या :
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिल्याने श्री गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेची पूजा असो वा सत्यनारायण पूजा… अशा विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी पुरोहितांकडे आतापासूनच विचारणा सुरू झाली आहे. पुरोहितांचे गणेशोत्सवातील दहाही दिवसांचे नियोजन एका आठवड्यापूर्वीच ठरले आहे आणि त्यात विशेष म्हणजे विविध देशांमध्ये राहणार्या मराठीभाषकांकडून ऑनलाइन पद्धतीच्या पूजेसाठीही विचारणा होत आहे.
त्याशिवाय दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळांसह सोसायट्यांमधील गणपती आणि घरगुती गणपतीच्या पहिल्या दिवशीच्या पूजेसाठी पुरोहितांना 8 ते 10 ठिकाणी बोलवण्यात आले आहे. परदेशात काही पुरोहितांना दोन ते तीन पूजेसाठी विचारणा झाली आहे. महेश शेवतीकर म्हणाले, या वर्षी उत्सवाच्या आठ दिवसांआधीच कार्यक्रमांसाठी विचारणा सुरू झाली आहे. उत्सवातील पहिल्या दिवशीचे नियोजन झाले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांमधूनही दोन ते तीन ऑनलाइन पद्धतीच्या पूजेसाठी विचारणा झाली आहे.
उत्सवातील दहाही दिवस पुरोहित व्यग्र असतात. कोरोनामुळे दोन वर्षे ऑनलाइन पद्धतीने धार्मिक कार्यक्रम करावे लागले. परदेशातूनही धार्मिक कार्यक्रमांसाठी विचारणा झाली असून, अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये दोन कुटुंबांकडून ऑनलाइन पूजेसाठी बुकिंग झाले आहे.
– अनुपम कुलकर्णी, पुरोहित
हेही वाचा